मंत्री महोदयांसमोर कोकणच्या सुनियोजित विकासाचे आव्हान

           महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे दणकट पाठबळ असलेले सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये कोकणातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र उदय सामंत, नितेश राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी तर दापोलीचे आमदार योगेश कदम यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. साहजिकच मंत्री महोदयांकडून सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुढील पाच वर्षात केंद्र व राज्यातील डबल इंजीन सरकारच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखून, सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून कोकणचा सुनियोजित विकास साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

     नव्या सरकारमध्ये पुन्हा एकदा उदय सामंत यांच्या खांद्यावर उद्योग खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते मराठी भाषा मंत्रीदेखील आहेत. सिंधुदुर्गातील कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातून आमदारकीची हॅट्ट्रीक करणारे भाजप आमदार नितेश राणे यांना प्रथमच मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. कोकण विकासाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या अशा मत्स्य व बंदरे मंत्रीपदाचा कारभार त्यांनी हाती घेतला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तरूण, तडफदार आमदार म्हणून ओळखले जाणारे दापोली-खेड-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. कदम यांच्याकडे गृहराज्यमंत्री (शहर), पंचायत राज, अन्न आणि नागरी पुरवठा, औषध प्रशासन अशा पाच खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दापोलीतील प्रचारसभेत योगेश कदम यांना निवडून द्या मंत्री करतो असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे योगेश कदम यांना आमदारकीच्या दुस-­या टर्ममध्ये मंत्रीमंडळात स्थान मिळालेले आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नसले तरी राज्यमंत्री म्हणून जी खाती मिळाली आहेत, ती पाहता त्यांना भविष्याच्या दृष्टीने बरेच काही शिकता येण्याजोगे आहे.

        राज्याच्या राजकारणात कोकणचे नेते म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यानंतर गेल्या काही वर्षात उदय सामंत यांच्या नावाचा उल्लेख केला जातो आहे. नव्या सरकारमध्ये त्यांच्या हाती पुन्हा एकदा उद्योगमंत्रीपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. उद्योगमंत्री म्हणून उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम राखणे ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. तसेच विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असताना रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला दिलेले शब्द आपण पूर्ण करून दाखवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोकणातील जिल्ह्यात छोटे-मोठे उद्योग उभारून मुंबईला जाणारा तरूणांचा लोंढा आपल्याला थांबवायचा आहे. यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन राजापूर, लांजा, मंडणगड, रत्नागिरी येथे छोट्या एमआयडीसी उभारल्या जातील, अशा प्रकारचे ‘व्हिजन‘ त्यांनी मांडले आहे. सामंत यांच्या या रोजगारनिर्मितीच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश येवो, हीच सर्वांची इच्छा आहे.

     मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी आपल्या कामाची छाप सोडली होती. आजच्या घडीला राणे खासदार म्हणून तर त्यांचे थोरले चिरंजीव निलेश आमदार म्हणून राजकारणात सक्रिय आहेत. राणेंचे धाकटे चिरंजीव नितेश राणे यांची यंदा मंत्रीपदाची पहिली इनिंग सुरू झाली आहे. आपण किनारपट्टीचा विकास आणि संरक्षणास प्राधान्य देणार, असे सांगताना कोकणातून अन्यत्र स्थलांतरित होणारा तरूण येथेच थांबला पाहिजे, कोकणातच चांगल्या पगाराच्या नोक­या निर्माण करण्याइतपत वातावरण तयार करण्याचा अजेंडा घेऊन ते मैदानात उतरले आहेत, बंदर विकास मंत्री म्हणून कोकणातील छोट्या-मोठ्या बंदरांचा विकास करण्याचे उद्दिष्ट त्यांच्यासमोर आहे. बंदर विकासातून कोकणच्या अर्थकारणाला चांगली दिशा मिळू शकते. मासेमारी, व्यापारी वाहतुकीबरोबरच पर्यटनवाढीच्या दृष्टीने बंदरांचा विकास महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी त्यांच्या खात्याला सर्वप्रथम बंदरांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ शास्त्रोक्तरित्या काढावा लागेल. ही बाब थोडी खर्चिक आणि वेळकाढू नक्कीच आहे. परंतु कोकणातील लहान-मोठी बंदरे आणि त्या ठिकाणच्या खाड्या गाळमुक्त केल्याशिवाय पर्याय नाही. कारण ब-­याच बंदरांची मुखं ही गाळामुळे एकतर अरूंद झाली आहेत किवा तेथे पाण्याची पुरेशी खोली नाही. काही बंदरे अशी आहेत की, जेथे भरतीच्यावेळीच नौकांना ये-जा करता येते. ओहोटीच्यावेळी तेथे नौकांना बंदरांमधून ये-जा करताना मुखाजवळच अडकून पडतात, अशी परिस्थिती आहे. ही बंदरे मासेमारी व पर्यटनदृष्ट्या वापरात आहेत. आता नितेश राणे हे मासेमारी आणि बंदर या दोन्ही खात्यांचे मंत्री असल्याने ते गाळमुक्त बंदर अभियान यशस्वीपणे राबवतील, अशी अपेक्षा आहे. कोकणात समुद्र व खाड्यांमध्ये साहसी सागरी पर्यटन तसेच अन्य प्रकारचे जलपर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यासाठी लागणा­-या आवश्यक त्या परवानग्या एकाच ठिकाणी लवकर मिळाव्यात, पर्यटन नौकांना मासेमारी नौकांप्रमाणे सबसिडी मिळावी, बंद स्थितीतील ट्राॅलर्स पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याची योजना आखावी, किना-­यावर पर्यटन विकास आणि संरक्षणाच्या दृष्टीने बंधारे कम रस्ते व्हावेत, अशा मागण्या पर्यटन व्यावसायिकांकडून सातत्याने होत असतात. त्या पूर्ण करण्यासाठी नितेश राणेंना मंत्री म्हणून योगदान द्यावे लागेल. बंदर विभागाचा विचार करता जहाज बांधणीसारख्या उद्योगांमध्ये पर्यावरण विभागाच्या परवानग्या महत्त्वाच्या ठरतात. त्या परवानग्या वेळेत कशा मिळतील या अनुषंगाने धोरण असायला हवे, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. लोकांच्या उंचावलेल्या अपेक्षा पाहता नितेश राणेंना त्यांच्याकडील दोन्ही खात्यांचा कारभार अधिक गतिमान करावा लागेल. त्यासाठी बंदर आणि मत्स्य विभागातील रिक्त पदे त्यांना भरावी लागतील.

   एकूणच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधील सुमारे ३०० कि.मी. लांब भूभागातील जनतेला त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सामंत-राणे यांच्या माध्यमातून जवळचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. सर्वप्रथम सरकारने कोकणातील आरोग्य यंत्रणा सुधारावी. लोकांना आरोग्यविषयक चांगल्या सोयी-सुविधा याव्यात. एप्रिल-मे महिन्यात उद्भवणारी पाणीटंचाई दूर करावी. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक आणि पर्यटन व्यावसायिकांचे होणारे नुकसान टाळावे. त्याचबरोबर दळणवळणाच्या दृष्टीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग शीघ्रगतीने पूर्ण करावा, या कोकणी जनतेच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्या पूर्ण होण्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून मंत्री महोदयांनी आपली ताकद पणाला लावण्याची गरज आहे.

Leave a Reply

Close Menu