केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ८ जानेवारी रोजी शाळेच्या ‘विठाई‘ सभागृहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम (अण्णा)नाईक, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, कलावलय संस्थेचे सुरेंद्र खांबकर, माजी नगरसेवक उमेश येरम, शाळेचे माजी विद्यार्थी अॅड.नंदन वेंगुर्लेकर, शिक्षणप्रेमी मोना नाईक, वासुदेव केरकर, शंकर कोरगांवकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर, उपाध्यक्ष राकेश सापळे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर आदी उपस्थित होते. पालकांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करा आणि त्यांच्या कौशल्याला खतपाणी घाला असे आवाहन शांताराम नाईक यांनी केले. या शाळेतील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय यश मिळवित आहेत हे कौतुकास्पद असून शाळेसाठी आपले नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली नाहीत त्या विद्यार्थ्यांनी नाराज होऊ नका. वेळ गेलेली नाही. वेळेचा उपयोग करून उज्ज्वल यश संपादन करा असे उमेश येरम यांनी तर शाळेच्या भौतिक सुविधांसाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अॅड.नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले. पालकांनी मुलांच्या समोर मोबाईलचा वापर कमी करा. जेणेकरून मुलांना मोबाईलची जास्त सवय लागणार नाही असा सल्ला संतोष गोसावी यांनी पालकांना दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अहवाल वाचन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर यांनी, पारितोषिकांचे वाचन शिक्षिका लिना नाईक, अनुश्री कुशे आणि मिलिद सरवदे यांनी तर निवेदन व आभार प्रा. वैभव खानोलकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, माता पालक समितीचे सदस्य, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी आणि स्वयंसेवक उपस्थित होते. याच कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी तथा पत्रकार प्रथमेश गुरव यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच शिक्षण सामाजिक प्रक्रियेतील विकासात्मक कार्याबद्दल गुंजन केळुसकर यांचा सन्मान करण्यात आला.
सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्तरोत्तर रंगत आणली. शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या सीमा नाईक व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास नाईक यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाची सांगता ‘गोरक्ष जन्म‘ या पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोगाने झाली. यात श्लोक महाजन, विघ्नेश पवार, वेदांत नाईक, गुरूदेव दामले, सान्वी रजपूत, सोहम कदम, निल पवार, मयंक नांदोडकर, वेद वेंगुर्लेकर, मिहिका वेंगुर्लेकर, दिप राऊत, आहिर प्रजापत, योगिराज पुराणिक यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने नाटक यादगार केले.