बॅ.खर्डेकर महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ या अभियाना अंतर्गत कलावलयतर्फे आयोजित केलेल्या नाट्य कार्यशाळेत ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व कलावंत तुषार भद्रे यांनी विद्यार्थ्यांना नाट्यकलेचा गाभा समजावून सांगितला. नाटक केवळ एक कला प्रकार नाही, तर ते जीवनाचा आरसा आहे. नाटकामध्ये माणसाच्या भावनांचे, संघर्षांचे आणि व्यक्तिमत्वाचे अनेक अंग समोर येतात. नाटक हे एक सशक्त माध्यम आहे, जे आपल्याला सामाजिक आणि मानसिक बदल घडवण्याची प्रेरणा देते. तर वाचन केल्यावरच नाटकाची खरी सुंदरता समजून येते. प्रत्येक पुस्तक वाचताना तुम्हाला त्यातले नायक, संवाद आणि भूमिका समजून घेता येतात, ज्यामुळे तुम्हाला अभिनय आणि नाट्यकलेची गोडी लागते. नाटकाच्या माध्यमातून विचार व्यक्त करणे, भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेला जगवणे हे नाट्यकलेची खरी वैशिष्ट्ये आहेत, असे श्री. भ्रदे यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, कलावलयचे सुरेंद्र खांबकर, संजय पुनाळेकर, पत्रकार महेंद्र मातोंडकर, अॅड. शशांक मराठे यांसह प्राध्यापक, विद्यार्थी व नाट्यप्रेमी उपस्थित होते.