२६ डिसेंबर २०२४ रोजी बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांचा ६१वा स्मृतिदिन दरवर्षीप्रमाणे यंदाही कॉलेजच्या परिसरात आयोजित केला होता. दरवर्षी एखाद्या मान्यवर व्यक्तीला निमंत्रित करून हा कार्यक्रम सातत्याने होत आला आहे. मात्र या कार्यक्रमासाठी प्रेक्षागृहातील उपस्थिती समाधानकारक नसते हा आजवरचा अनुभव आहे. हे असे का होते याचा शोध घेणे आवश्यक ठरते. कुठेतरी काहीतरी चुकते आहे एवढे निश्चित !
बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचे वेंगुर्ला आणि पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांवर फार मोठे उपकार आहेत. १९६२ सालापर्यंत वेंगुर्ला तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती. बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांनी पुढाकार घेऊन वेंगुर्ला कॉलेजची स्थापना केली, दाभोळकर नावाच्या दिलदार व्यक्तीने बाळासाहेबांच्या शब्दाला मान देऊन आपला टुमदार बंगला विस्तृत जमिनीसह उपलब्ध करून दिला. म्हणून १९६२-६३ या शैक्षणिक वर्षापासून कला व वाणिज्य शाखेचे वर्ग सुरु झाले. सुरूवातीला हे कॉलेज कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाशी संलग्न होते. परंतु गेल्या चार दशक म्हणजे १९७४ पासून मुंबई विद्यापीठाशी संलग्न झाले. बॅ. बाळासाहेब खर्डेकर हेच या कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. आज या कॉलेजचा बराच विस्तार झाला आहे. कला व वाणिज्य शाखेबरोबरच विज्ञान शाखा जोडली गेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ज्युनिअर कॉलेजचा विभाग कॉलेजला जोडला गेला आहे. बॅ. खर्डेकर यांच्या निधनानंतर वेंगुर्ला कॉलेजला त्यांचे नाव देऊन वेंगुर्लावासीयांनी त्यांचे अल्पसे का होईना पण ऋण फेडले ही मोठी समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल.
वेंगुर्ला कॉलेजची स्थापना बॅ.खर्डेकर यांनी केली नसती तर वेंगुर्ला आणि आजुबाजुच्या परिसरातील गरीब आणि सामान्य कुटुंबातील होतकरू मुले महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहिली असती. त्यावेळी जवळचे कॉलेज हे २५ कि.मी. अंतरावरचे सावंतवाडी येथील खेमराज कॉलेज होते. मात्र अशा दूरच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी वाहतूक सुविधा त्याकाळी आताच्या सारखी मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हती. आर्थिक कमकुवत वर्गातील मुलांना इतक्या दूर जाऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणे शक्यच नव्हते. बॅ. खर्डेकर यांच्या दूरदृष्टीने हे शक्य झाले. या कॉलेजमधून आजवर हजारो तरूण पदवीधर झाले आहेत. विविध क्षेत्रात त्यांनी नाव कमावले. जीवनात स्थिरस्थावर झाले. परंतु कॉलेजमधून शिकून बाहेर पडल्यावर यातील अनेक मुलांनी या कॉलेजकडे मागे वळून पाहिले नाही हे कटू सत्य आहे. ज्यांच्यामुळे आपण जीवनात मोठी पदे मिळवली, जीवनात यशस्वी झालो आणि त्या आधारावर आपले संसार फुलवले त्या कॉलेजविषयी कृतज्ञताभाव मनात असायला हवा. आपल्याकडून या कॉलेजसाठी जे करणे शक्य आहे ते करायला हवे. निदान बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गरीब मुलांसाठी बक्षिसे, पाठ्यवेतन, कॉलेजच्या गरजेनुसार आर्थिक देणगी देऊन ऋण फेडायला हवे.
२६ डिसेंबर हा दिवस वेंगुर्ला आणि पंचक्रोशीचा अनिवार्य समारंभ व्हायला हवा. या कार्यक्रमाचे आयोजन करताना सर्व क्षेत्रातील मंडळींना सोबत घेणे आवश्यक आहे. आजी-माजी विद्यार्थी यांनी तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावेच. परंतु त्यांचे पालक, स्थानिक आमदार, वेंगुर्ला नगरपरिषद सदस्य, वेंगुर्ला तालुक्यातील पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य, सामजिक संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक पत्रकार, प्रतिष्ठित लोक, विविध खात्यातील वरिष्ठ सरकारी अधिकारी यांचा या कार्यक्रमात सहभाग असायला हवा. त्यासाठी कॉलेजचे प्राचार्य आणि कॉलेजच्या व्यवस्थापन समितीने वरील सर्व घटकांची महिनाभर अगोदर बैठक बोलवावी आणि बॅ. खर्डेकर स्मृतिदिन समिती स्थापन करून कामाची विभागणी करावी. केवळ ठराविक मुलांसाठीच हा कार्यक्रम होऊ नये. हा कार्यक्रम भरगच्च होण्यासाठी २६ डिसेंबर हा दिवस कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षिस वितरण सोहळ्याशी जोडावा. म्हणजे आपोआपच याला भव्य स्वरूप प्राप्त होऊ शकेल.
– ज.अ.रेडकर, पणजी-गोवा मोबा. ९०२८४९९८५८
एक माजी विद्यार्थी