खाशाबा जाधव व्यायामशाळेचे लोकार्पण

वेंगुर्ला नगरपरिषदेने कॅम्प पॅव्हेलियन हॉलनजिक तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने शासनाच्या सुमारे २३ लाख निधीतून साकारलेल्या खाशाबा जाधव व्यायामशाळेचे लोकार्पण ३ फेब्रुवारी रोजी आमदार तथा सिधुरत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर, दिलीप गिरप, केसरकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश तेली, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, उमेश येरम, प्रशांत आपटे, नागेश गावडे, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, ‘माझा वेंगुर्ला‘चे राजन गावडे यांच्यासह समिर गावडे, स्वप्नील गावडे, संजय परब, देविदास वालावलकर, राजू परब, गणपत केळुसकर, प्रकाश मोटे, विशाल राऊत आदी उपस्थित होते.

 या व्यायामशाळेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना व्यायामाची सवय लागली, तरूण-होतकरू  व्यायामपटू तयार व्हावेत म्हणून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेंतर्गत मंजूर निधीतून नगरपरिषद व्यायामशाळा विकसन करणे हे काम प्रस्तावित केले हते. सदर कामासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून २३ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून व्यायामशाळेचे अंतर्गत फ्लोअरिगसाठी रबर टाईल्स, स्वच्छतागृहाची दुरूस्ती, साऊंड सिस्टिम, लॉकर्स सुविधा, टीव्ही संच, पुरूष व महिला यांच्यासाठी स्वतंत्र चेंजिग रूम, इमारत रंगकाम, विद्युतीकरण आदी कामे करण्यात आली आहेत. या व्यायामशाळेत ड्युअल केबल क्रॉस, लेग प्रेस, लेग एक्स्टेंशन, कार्डिओ, केबल क्युरल, ड्युअल अॅक्सिस डिक्लाइन बेंच, फ्लॅट बेंच, बॅटलींग रोप यासह अन्य व्यायाम साहित्य उपलब्ध आहे. न.प.च्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, म्हणून लिलाव प्रक्रियेद्वारे ही व्यायामशाळा चालवण्यासाठी मक्ता निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी या व्यायामशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी कंकाळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu