अणसूर पाल हायस्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम अणसूर पाल शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष आत्माराम गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हा रूग्णालय सावंतवाडीचे वैद्यकीय अधिकारी निलेश अटक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
पत्रकाराला समाजभान असेल तरच तो चांगली पत्रकारिता करू शकेल. प्रिंटमिडीयाच्या काळात ‘वाचकांचा पत्रव्यवहारा‘ पुरतेच सामान्य माणसाला व्यक्त होता येत होते मात्र तुमच्या हातातल्या मोबाईलने सोशल मीडीयाच्या माध्यमातून पत्रकारितेचा आयाम वाढवीला आहे. असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी काढले. निलेश अटक यांनी बदलत्या जीवनशैलीत समतोल आहार, व्यायाम, खेळांचे महत्व अधोरेखित करीत, विद्यार्थी जडणघडणीत सजग पालकत्वाची जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले. आत्माराम गावडे यांनी चांगला माणूस व देशभक्त नागरिक बनण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. उद्योजक दादासाहेब परूळकर यांनी आपल्या जीवनातील संघर्षाच्या काळात कष्ट, श्रम, मुल्ये यावर श्रद्धा ठेवून आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवीलेले यशाचे महत्व विद्यार्थ्याना सांगितले. यावेळी शालेय समिती चेअरमन महादेव मातोंडकर, सदस्य दीपक गावडे, देऊ गावडे, दत्ताराम गावडे, पाल माजी सरपंच राजाराम गावडे, गजानन गावडे, आनंद उर्फ बिट्टू गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी सन २०२३-२४मध्ये दहावीमध्ये प्रथम आलेल्या मंदार नाईक, यज्ञेश गावडे, भूमिका राऊळ व विविध विषयात सर्वोच्च गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा देणगीदार रोख बक्षिसे, संस्था पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन तर शालेय क्रीडा स्पर्धा, सहशालेय उपक्रमात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. दहावीतील विद्यार्थिनी धनश्री गावडे हिची सन २०२४-२५ साठी आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करून तिला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशालेत गजानन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रिक कोर्सचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन विजय ठाकर, प्रास्तविक व अहवाल वाचन मुख्याध्यापक राजेश घाटवळ, बक्षिसांचे वाचन चारूता परब तर आभार अक्षता पेडणेकर यांनी मानले. संध्याकाळी ‘रंगशिशिर‘ हा विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यात विद्यार्थ्यांनी नृत्य, लोकनृत्य, लावणी, मिम्स, थीमसाँग, नाटिका सादर करुन रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आजी-माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.