हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानसीश्वराचा जत्रौत्सव संपन्न

वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील प्रसिद्ध श्री देव मानसीश्वराचा वार्षिक जत्रोत्सव 5 फेब्रुवारी रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी या मानसीश्वराची ख्यातीकित असल्याने भाविक या जत्रोत्सवाची आतुरतेने वाट पहात असतात. इंग्रजी नवीन वर्षाची दिनदर्शिका हाती येताच स्थानिकांसह चाकरमानीही सर्वात आधी या जत्रोत्सवाची तारीख पाहून तशाप्रकारचे नियोजन करतात. यावष 5 फेब्रुवारी रोजी हा जत्रोत्सव संपन्न झाला. या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस मंदिराच्या आजूबाजूला दुकानांसाठी छोटे-मोठे मंडप उभारुन विक्रेत्यांनी आपली जागा निश्चित केली होती. जत्रोत्सवाच्या आदल्या दिवशीपासून काही दुकाने सुरु झाल्याने याठिकाणी जत्रोत्सवाचा माहोल निर्माण झाला होता. मध्यरात्रीपासूनच जत्रोत्सवाला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला मानाची निशाणे अर्पण केल्यानंतर उर्वरित भाविकांनी केळी, नारळ, निशाणे अर्पण करण्यास सुरुवात केली. जत्रोत्सवानिमित्त नारळ, केळी, निशाणे याबरोबरच विविध खेळणी, गृहपयोगी वस्तू, मिठाई, हॉटेल्स यांची दुकाने मोठ्या प्रमाणात मांडण्यात आली होती. देवदर्शनानंतर भाविकांनी येथील विविध दुकानांना भेटी देत, मोठ्या प्रमाणात खरेदी करीत खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटला.

Leave a Reply

Close Menu