वेंगुर्ल्यातील बंधाऱ्यांसोबतच संरक्षक भितींचीही दुरावस्था

वेंगुर्ला साकव ते मानसी पूल मार्गे समुद्राला जोडणाऱ्या ओहोळामधील बंधाऱ्यांची दयनीय दुरावस्था झाली आहे. तसेच संरक्षक भिंतीही कोसळल्या आहेत. भरतीच्यावेळी समुद्रातील खारे पाणी ओहोळातून सुंदरभाटले, साकवभाटी, मायबोली हॉटेल परिसर विहिर, कुंभवडे, साकववाडी येथील विहिरींमध्ये घुसण्याचा धोका निर्माण झाला असून तसे झाल्यास येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. दरम्यान, याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून भविष्यात होणारे नुकसान टाळावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांमधून होत आहे.

            शहरातील एसटी स्टॅण्ड नजिक वेंगुर्ला नगरपरिषदेच्या गार्डनला लागूनच असलेल्या आणि समुद्राला मिळणाऱ्या ओहोळामधील बंधाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. ओहोळातील दोन्ही बाजूंनी काही ठिकाणी असलेल्या संरक्षक भिंतीही कोसळल्या आहेत. तर बऱ्याच ठिकाणी संरक्षक भिंतीच अस्तित्वात नाहीत. या ओहोळाला लागूनच स्थानिक रहिवाशांची घरे तसेच माडबागायती आहेत. या माडबागायतीमधून उत्पन्न घेऊन येथील रहिवासी आपला उदरनिर्वाह करीत आहेत. संततधार पडणाऱ्या पावसाने किंवा समुद्रातील भरतीच्यावेळी पाण्याची पातळी वाढून संरक्षक भिंत नसल्याने हे खारे पाणी आजूबाजूच्या माडबागायतीमध्ये घुसते. वेळप्रसंगी रहिवाशांच्या घरामध्येही घुसण्याचे प्रकार घडले आहेत. हा प्रकार सुरूच राहिल्यास भविष्यात नागरिकांना पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच माडबागायतींचेही नुकसान होऊन रहिवाशांना आर्थिक फटका बसणार आहे. या परिसराला लागूनच ग्रामपंचायतीचा भाग येत असल्याने या खाऱ्या पाण्याची झळ परबवाडा ग्रामपंचायतमधील गवंडेवाडा, परबवाडा या भागालाही बसण्याची शक्यता आहे.

            पावसाळी हंगाम सुरू व्हायला अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून या महत्त्वाच्या समस्येचे निराकरण करावे. तसेच दुरावस्था झालेले बंधारेही पूर्ववत करावेत अशी मागणी रहिवाशांमधून होत आहे. दरम्यान, होलीक्रॉस नजिकच्या रहिवाशांनी आपण स्वतः श्रमदान करून बंधारा घातल्याने त्यांच्या विहिरींमध्ये खारे पाणी जाण्याचा सद्यस्थितीतील धोका टळला आहे.

Leave a Reply

Close Menu