दशावतार या कलेचा उगम कसा झाला, याबाबत अनेक मतमतांतरे असली तरी ही आपल्याच लाल मातीतील कला असून यावर आपला ठाम विश्वास आहे. मी एक प्रथितयश वकील आहे. दशावतारावर सर्वात प्रथम पीएचडी मिळविण्याचा मान मला प्राप्त आहे. त्यामुळे अगदी पुराव्यानिशी आपले म्हणणे मी सिद्ध करू शकतो. मालवणी मुलुख आणि दशावतार कला यांचे नाते अगदी पुरातन आहे. संत साहित्यात त्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे दशावताराबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांनो आता शांत बसा, दशावतार हा तळकोकणाचा श्वास आहे. दशावताराचा यक्षगानशी कोणाताही संबंध नाही. उलट सीमाभागातील लोकांनी आमच्या दशावतारातून आपल्या यक्षगानाला विकसित केले आहे, असे प्रतिपादन डॉ. अशोक भाईडकर यांनी अखिल दशावतार नाट्य संस्था सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय दशावतार नाट्य संमेलनाचे अध्यक्ष स्थानावरुन बोलताना केले.
या संमेलनाच्या अनुषंगाने 8 फेब्रुवारी रोजी पाटकर हायस्कूल, दाभोली नाका, बाजारपेठ, मारूती स्टॉप ते रामेश्वर मंदिरपर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. शुभारंभ प्रा.महेश बोवलेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या ग्रंथदिडीत संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अशोक भाईडकर, उपाध्यक्ष प्रशांत परब, प्रसिद्धी प्रमुख राजाराम धुरी, कार्याध्यक्ष प्रा.वैभव खानोलकर, संजय पाटील, दशावतारी कलावंत पप्पू नांदोसकर, सर्पमित्र महेश राऊळ, प्रा.सचिन परूळकर, पाटकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुशांत धुरी, शिक्षक समृद्धी पिळणकर यांच्यासह पाटकर हायस्कूल आणि खर्डेकर महाविद्यालयाचे विद्याथ सहभागी झाले होते.
सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष डॉ. भाईडकर व अन्य विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवृत गटविकास अधिकारी तथा प्रतीथयश लेखक विजय चव्हाण, वेंगुर्ले मुख्याधिकारी परितोष कंकाळ, वेंगुर्ल्यांचे पोलीस उपनिरीक्षक राठोड, वाहतूक पोलीस मनोज परुळेकर, ज्येष्ठ भजनी बुवा भालचंद्र केळुसकर, दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण, कलादान पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलावंत यशवंत तेंडोलकर, समाजकल्याणचे माजी सभापती अंकुश जाधव, गोवा येथील सप्तसूर संगीत संस्थेचे अध्यक्ष विजय केरकर, न्यू एज्युकेशन सोसायटी उभादांडाचे अध्यक्ष विरेंद्र कामत-आडारकर, सचिव तथा रांगोळीकार रमेश नरसुले, दशावतार कलाकार महेश गवंडे, संतोष रेडकर, पपू नांदोसकर, समर्पण फाऊंडेशन संस्थेचे खजिनदार जगदिश सापळे, शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव महेंद्र मातोंडकर, वेताळ प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर, सिंधुरक्त मित्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा सर्पमित्र महेश राऊळ, जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर तसेच अखिल दशावतार नाट्य संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दशावतार कलेबाबत काही कानडीप्रेमींनी विनाकारण आपल्या भागातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. ज्यांचा दशावताराशी काहीही संबंध नाही अशांनी कोणतेही विधान करण्यापूव हजारवेळा विचार करावा. दशावतार हा आमचा श्वास आहे. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातच या लोककलेचा उगम झाला. अगदी संतकाळापासून लोकरंजनातून लोकप्रबोधन करण्याच्या कार्यात दशावताराचे योगदान आहे. त्यामुळे तळकोकणातील प्रत्येक माणसाच्या नसानसात दशावतार भिनलेला आहे. कालपरत्वे दशावतारात अनेक बदल झाले असले तरी दशावताराचा मूळ बाज आजही कायम आहे. जिल्ह्यातील अनेक कलाकार ही कला अधीक वृद्धिंगत करण्यासाठी नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यांच्या या तळमळीला द्यावी तेवढी दाद कमीच आहे. ही कला याच मातीतील असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे कोणीही पुन्हा आमच्या दशावताराबाबत कोणतीही वक्तव्ये करू नयेत. आमचे आमच्या कलेवर जेवढे प्रेम आहे तेवढाच आदर आम्ही अन्य कलांचाही करतो. त्यामुळे दशावतार आणि यक्षगान यातील तुलना आता बंद करा. मुळात यक्षगान हे लोकनाट्य नव्हेच. ते तेथील प्रांतातील लोकगायन आहे. दशावतारातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या यक्षगानात काही बदल केले असावेत त्यामुळे ते दशावताराच्या जवळचे वाटत असावे, असेही डॉ. भाईडकर पुढे बोलताना म्हणाले.
समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्ग, शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग, आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले व जागृती कला-क्रीडा मंडळ वेंगुर्ले या संस्थांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या संमेलनास दशावतारातील लोकप्रिय ज्येष्ठ कलावंतही उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत डॉ. अशोक भाईडकर यांनी केले.
दशावतार अधिक विकसित व्हावे यासाठी आज अनेक प्रयोग केले जात आहेत. उत्स्फूर्तता हा दशावताराचा प्राण आहे. आजही लिखित संहितेचा वापर दशावताराच्या प्रयोगासाठी होत नाही. सलग पाच ते सहा तास आपल्या आध्यात्म्ातील अफाट ज्ञान कौशल्याच्या बळावर दशावतारी कलाकार रसिकांना जागच्या जागी खिळवून ठेवण्याची क्षमता ठेवतो. हीच तर खरी आपल्या दशावतार लोककलेतील ताकद आहे. जगात अन्य कोठेच नाही अशी आपली कला आज जगाला भूरळ घालत आहे. ती पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी अशा प्रकारची संमेलने होणे गरजेचे आहे, असे यावेळी बोलतान निवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले. दशावतार कलावंत ही कला जिवंत ठेवण्यासाठी येथील कलाकार सातत्याने स्वतःला अपडेट करतात. सतत अध्यात्माचा अभ्यास करत असतात. त्यामुळे दशावतार लोककला सर्वश्रेष्ठ आहे, असे पालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ म्हणाले. विरेंद्र कामत आडारकर, भालचंद्र केळुसकर, ओमप्रकाश चव्हाण, अंकुश जाधव, रमेश नरसुले यांनीही आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन दशावतार कलेचे अभ्यासक तथा अखिल नाट्य संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. वैभव खानोलकर यांनी केले. शेवटी आभार प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी मानले.