माध्यमिक शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. दहावीमध्ये उत्तीर्ण होणे हे प्रत्येक विद्यार्थ्याला सहज जमत आहे. परंतु, टक्केवारी वाढविण्यासाठी अभ्यासामध्ये कठोर परिश्रम घ्यावे लागत आहेत. परीक्षेची भीती कमी झाली, तरी उत्सुकता मात्र, वाढलेलीच आहे. शिक्षणाचे बदलते धोरण दहावीच्या मुलांसाठी टेन्शवरची मात्रा ठरत आहे. दहावी परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांसहीत पालकांमध्येही धडकी भरते. आपल्या पाल्यांना जास्तीत टक्केवारी मिळवावी यासाठी पालक धडपडत असतात. तर शाळेचा निकाल सर्वांपेक्षा जास्त लागण्यासाठी आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा लावून आपली शाळा सर्वांच्या नजरेत आणण्यासाठी शिक्षकही तेवढेच परीश्रम घेतात. प्रसंगी वर्गातील नियोजित तासिकांसोबतच जादा क्लासेस घेऊन शिक्षक विद्यार्थी घडवित आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सुलभ सोपी गेली असली तरी निकालाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात.
दहावीच्या परीक्षेत पूर्वीपेक्षा अलिकडे शिक्षण पद्धतीत बराच बदल केला आहे. सामान्यातला सामान्य विद्यार्थी दहावी उत्तीर्ण व्हायला हवा अशाप्रकारचे शिक्षण धोरण राबविले जात आहे. अंतर्गत मूल्यमापानाठी प्रत्येक विषयाला २० गुण ठेवण्यात आले आहे. ही परीक्षा संबंधित शाळेत घेतली जाते. मराठी, इंग्रजी, हिदी यासाठी तोंडी २० गुण, गणित विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेतली जाते. तर प्रॅक्टीकल घेऊन विज्ञान विषयाचे गुण दिले जातात. तसेच विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या कामाचेही मूल्यमापन करून गुण देण्यात येतात.
बोर्डाने शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा या क्षेत्रावर सुद्धा भर दिला आहे. एखाद्या विद्यार्थ्यांने किवा विद्यार्थीनीने कला किवा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यास त्याआधारीत गुण त्यांना देण्यात येतात. यासाठी संगीत क्षेत्रात तीन परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. चित्रकलेची दोन प्रमाणपत्रे तर जिल्हास्तरावरून विभागस्तरावर गेलेल्या क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जादा गुण मिळतात. या सर्व गुणांचा उपयोग विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीला दहावीच्या परीक्षेमध्ये होतो.
बदलत्या शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमधील भीतीचे प्रमाण तर कमी झाले आहे. परंतु, उत्सुकता मात्र कायम आहे. आपला नंबर कुठल्या वर्गात पडला आहे, याची चाचपणी अजूनही परीक्षेच्या आदल्या दिवशी संबंधित परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थी करतात. दहावीच्या परीक्षेसाठी नविन पेन- पट्टीची विद्यार्थ्यांकडून खरेदी होते. तर जवळचे नातेवाईक, शेजारी वगैरे परीक्षेच्या शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांना पेन भेट म्हणूनही देत असतात.
विद्यार्थ्याच्या भविष्यातील करिअरच्यादृष्टीने पालकांना आजच्या युगातही दहावीचा टप्पा फार महत्त्वाचा वाटत आहे. परीक्षेला जाताना कुठल्याही प्रकारचे दडपण आपल्या पाल्यावर असू नये यासाठीची काळजी पालक घेत आहेत. एरव्ही घरातील अडीअडचणीला याच मुलांना वाहने उपलब्ध करून देणारे पालक दहावी परीक्षेला मात्र स्वतः गाडीचे सारथी बनून मुलांना परीक्षेसाठी ने-आण करतात. तर काहीजण चारचाकी, तीनचाकी गाड्या ग्रुपसाठी उपलब्ध करून देतात.
दहावीच्या परीक्षा भयमुक्त वातावरणात पार पडून कॉपीसारखे अनुचित प्रकार घडू नयेत याकरिता शासनाने कॉपीमुक्त परीक्षा धोरण राबविले आहे. ज्या केंद्रावर विद्यार्थी कॉपी करताना आढळून येतील ते केंद्रच भविष्यात रद्द होणार आहे. असे असून देखील दहावीच्या मराठीच्या पेपर दिवशी राज्यातील काही ठिकाणांमधून मास कॉपी आणि पेपर फुटण्याचे जे प्रकार उघडकीस आले ते पाहून कुठल्याही सुज्ञ पालकाची व शिक्षकाची मान शरमेने खाली जाईल असेच होते. एका ठिकाणी झेरॉक्स सेंटरवरच पेपर लीक झाला होता तर दुसरीकडे शिक्षिकाच रिक्षामध्ये बसून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासारखा प्रकार करत असल्याचे उघडकीला आले. प्रसार माध्यमांच्या सजगतेमुळे असे अनुचित प्रकार उघडकीला येत असले तरी संबंधितांवर कठोर कारवाई करून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद, जल्लोष सगळीकडे साजरा होत आहे आणि त्याचवर्षी महाराष्ट्रात मराठी याच विषयाबाबत सामूहिक कॉपीचे एवढे प्रकार उघड व्हावेत यासारखी लज्जास्पद गोष्ट नाही. काही ठिकाणच्या कॉपीच्या प्रकारामुळे वर्षभर प्रामाणिकपणे मेहनत करणाया विद्यार्थ्यांवर अन्याय तर होणार नाही ना याची खबरदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
परीक्षेसंदर्भात आजचे विद्यार्थी हे खूपच जागरूक आहेत. ते एका एका गुणांसाठी धडपडताना दिसतात. पण विद्यार्थ्यांपेक्षा पालकांच्या वाढत्या गुणात्मक वाढीच्या हव्यासापोटी काही प्रमाणात विद्यार्थ्यांचा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ‘व्यर्थ स्पर्धा‘ असा होत असलेला दिसून येतो. वर्षभरात मिळवलेल्या ज्ञानाची तपासणी निखळपणे होणे आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नाही. बदलत्या शैक्षणिक धोरणामध्ये एकूणच परीक्षा घेण्याच्या पद्धतीवर तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन काही गुणवत्ता तपासणीचे पर्याय समोर आले तर प्रामाणिक मेहनती विद्यार्थी आणि कसोशीने प्रयत्न करणारे शिक्षक यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल.