टीम फ्लाय 360 डहाणू, टीम मेंगलोरद्वारे विविधढंगी पतंगांचा आविष्कार
वेंगुर्ल्याच्या मऊशार पांढऱ्या शुभ्र किनाऱ्यावर पाय रोवून वाऱ्याच्या दिशेने होणारी विविधढंगी, विविधरंगी पतंगबाजी अनेकांना मोहवून गेली. जगभरात लोकप्रिय ठरणाऱ्या फ्लाय 360 डहाणू, टीम मेंगलोर, फ्लाय 365 सुरत व बेळगाव फ्लायर्स या टीमच्या सदस्यांनी विविधांगी पतंगबाजीचे प्रदर्शन घडवत अलौकिक आनंदाची अनुभूती उपस्थितांना दिली. ‘माझा वेंगुर्ला’ संस्थेने सलग सहाव्या पतंग महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले.
शनिवार, रविवार दोन दिवस दुपारी 3 वाजल्यापासून सागरेश्वर किनाऱ्यावर पतंगप्रेमींनी गद केली होती. या चारही टीमच्या सदस्यांनी विविध आकारातील विविध रंगाचे नानातऱ्हेच्या पतंगांचे उड्डाण केले. पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते हवेत पतंग उडवून पतंग महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले पालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, उभादांडा गावचे सरपंच नीलेश चमणकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माझा वेंगुर्लाचे अध्यक्ष जनार्दन शेट्ये, कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव राजन गावडे, माजी अध्यक्ष नीलेश चेंदवणकर, मोहन होडावडेकर, तरुण भारत संवादचे सिंधुदुर्ग आवृत्ती संपादक शेखर सामंत, अटल प्रतिष्ठान सावंतवाडीचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर, कपिल पोकळे, ‘भेरा’ चित्रपटाचे लेख्ाक प्रसाद खानोलकर आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते सागरास नारळ अर्पण करण्यात आला.
भारतात प्राचीन काळापासून पतंगबाजी मोठ्या उत्साहाने केली जाते. कालांतराने पतंगबाजीमुळे अनेकांना नाहक त्रास झाल्याने यात बदल होत गेला. ही पतंगबाजी आता सुरक्षित ठिकाणी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून केली जात आहे. काचेचा वापर करून पंतगाचा बनविला जाणारा धारधार मांजा आता हद्दपार झाला आहे. तर पतंग काटण्याचे खेळही कालबाह्य झाले आहेत. फक्त आनंद मिळविणे आणि आपली प्राचीन संस्कृती जपणे या हेतूने पर्यटन क्षेत्रात पतंगबाजीचा वापर होऊ लागला आहे. वेंगुर्ल्यातील ‘माझा वेंगुर्ला’ या सामाजिक संस्थेने याच हेतूने वेंगुर्ल्यात आठ वर्षापूव पतंग महोत्सव भरविला होता. मेंगलोर येथील टीमने यासाठी माझा वेंगुर्ला संस्थेला सहकार्याचा हात दिला होता. त्यानंतर सलग सहा वर्षे हा पतंग महोत्सव वेंगुर्ल्यातील सांस्कृतिक अंगाचा एक अविभाज्य घटक बनून राहिला आहे, असे यावेळी आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आले.
पर्यटनदृष्ट्या वेंगुर्ल्याचे नाव सर्वदूर पसरविणे याच हेतूने या महोत्सवाचे आयोजन त्याकाळी वेंगुर्लातील जाणत्या व सजग नागरिकांनी एकत्र येत केले होते. पतंग महोत्सवाला होणारी गद व त्यामुळे वेंगुर्ल्यातील समुद्र किनाऱ्याला प्राप्त होणारे महत्त्व या गोष्टी वेंगुर्ल्याच्या पर्यटन विकासाला हातभार लावणाऱ्या आहेत. माझा वेंगुर्लाच्या टीमने यासाठी सुरू केलेले प्रयत्न उजवे आहेत, असे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले. जयप्रकाश चमणकर, सचिन वालावलकर, दिलीप गिरप, प्रसाद खानोलकर, शेखर सामंत आदींनी मनोगत व्यक्त केले. संजय पुनाळेकर यांनी प्रास्ताविक, तर प्रशांत आपटे व शशांक मराठे यांनी सूत्रसंचालन केले.
पतंग महोत्सवामध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, लहान मुले तसेच मोठ्यांसाठीचे फनी गेम्स, वाळू शिल्पकार संजय हुले यांनी साकारलेले संत गाडगेबाबांचे वाळू शिल्प लक्ष वेधून घेत होते. युसुफ आवटी व सहकारी यांनी सादर केलेले कराओके गायन, हर्षद मेस्त्री प्रस्तुत ‘हर्षनाद’ ऑर्केस्ट्रा, फायर शो यांनी रसिकांची मने जिंकली.