वेंगुर्ला येथील सुपुत्र विक्रमादित्य राजन शिरसाटयांनी मुंबईतील प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियांत्रिकीमध्ये पीएचडी पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली. श्री.शिरसाट यांनी काजू, सफरचंदामधील जैवसक्रीय घटक टिकवून ठेवण्यासाठी व त्यांचे निष्कर्षण करण्यासाठी प्रक्रिया विकासावर संशोधन केले. निष्कर्षण व वाळवणी दरम्यान होणाया प्रक्रियांच्या यंत्रणांचा अभ्यास करण्यासाठी गणितीय मॉडेल्स विकसित करण्यात आले आहेत. हे संशोधन औद्योगिक प्रक्रियांमध्ये सुधारणा घडवून आणण्यास मदत करू शकते. यासाठी शिरसाट यांना पद्मभूषण प्रा.डॉ.जे.बी.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. वेंगुर्ल्याशी माझी नाळ कायमची जुळलेली आहे. माझ्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या परिसराचा व उद्योगाचा विकास करण्याची संधी मिळावी असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले.
आपल्या या यशामागे आपले मार्गदर्शक, कुटुंब व शैक्षणिक समुदायाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच विक्रमादित्य शिरसाट सध्या स्टार्टअप उभारण्याच्या दिशेने कार्यरत आहेत. जे आंब्याच्या बियांचे पुनर्वापर करून त्यामधून तेल काढण्याच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे तंत्रज्ञान आंबा प्रक्रिया उद्योगातील टाकाऊ पदार्थांचा उपयोग करून शाश्वत व नवकल्पनायुक्त उपाय शोधण्यास मदत करेल. तसेच त्यांनी केलेले संशोधन कृषी उत्पन्नांचे जास्तीत जास्त पुनर्वापर आणि टाकाऊ पदार्थांचे उपयोग करण्यास मदत करेल, ज्यामुळे शाश्वतता वाढेल व कचयाचे प्रमाण कमी होईल. शिरसाट यांच्या या यशामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.