आसोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातलं एक गाव. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे गावचा बराचसा भाग सुरंगीच्या झाडांच्या गर्द सावलीत वसला आहे. रस्त्याच्या दुतर्फा बघावीत तिकडे सुरंगीची मोठाली झाडं आहेत. या सुरंगीच्या वृक्षांमुळे ऐन उन्हाळ्यातही इथे थंड सावली अनुभवता येते. आसोली गावातला हा सुरंगी फुलांचा हंगाम प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी निवांता हॉस्पिटॅलीटीजतर्फे सुरंगी कोकणी होम येथे सुरंगी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात 22 फेब्रुवारी पासून करण्यात आली. एक दिवसाच्या सहलीमध्ये सहभागी पर्यटकांनी स्थानिक आदरातिथ्य आनंद घेत सुरंगीच्या झाडाखाली वनभोजनाचा आस्वाद घेतला. सुधीर आसोलकर यांनी स्थानपुरुषाला गाऱ्हाणे घालत कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी या उपक्रमाला भेट देत शुभेच्छा दिल्या. स्थानिकांसोबत इथं भेट देणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाचं ऋतुचक्र, लोकजीवन, संस्कृती समजून घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात निवांता हॉस्पिटॅलीटीज तर्फे सुरंगी कोकणी होम स्टेची टी-शर्ट लॉन्च करण्यात आली. जितेंद्र वजराटकर आणि जॉर्ज जोएल यांनी सहभागीना सुरंगी फेस्टिवल या उपक्रमाची माहिती दिली.विक्रांत आजगावकर, श्रुती आजगावकर यांनी सहभागींचे आभार मानले.
कोकणात शहरीकरण, आंबा-काजूच्या बागा यामुळे इतरत्र जंगली झाडं तोडली जात असताना या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरंगीची झाडं कशी काय टिकून आहेत? त्याचं कारण या गावाची अर्थव्यवस्थाच सुरंगीच्या झाडांवर अवलंबिली आहे. इथले लोक सुरंगीची फुलं, कळे विकून मोठं उत्पन्न कमवतात. संपूर्ण गावाचा सुरंगीच्या फुलांचा 7 कोटींचा टर्नओव्हर आहे. सुरंगीचा फुलण्याचा हंगाम फक्त 15 दिवस ते महिनाभराचा. साधारण फेब्रुवारी महिन्यात सुरंगीची झाडं पांढऱ्या टपोऱ्या अतिशय सुगंधी फुलांनी बहरतात. या काळात लोक झाडाखाली जुनी साडी वा पातळांची पालं टाकून ठेवतात. पडलेली फुलं गोळा करून ठेवतात व व्यापारी येऊन ते घेऊन जातात. फुललेल्या फुलांना साधारण 300 रु. किलोपर्यंत दर मिळतो, तर कळे काढून विकल्यास त्याला 700 ते 800 रु. किलोपर्यंत दर आहे. झाडावरून कळे काढणं हे खूप जोखमीचं काम असतं. एका झाडापासून साधारण 8 ते 10 किलो फुलं मिळतात. कळ्यांचं वजन जास्त भरतं.
गावातून ही फुलं वाशी मार्केटला जातात आणि तिथून ती जहाजांमधून परदेशात पाठवली जातात. मुख्यतः सुगंधी परफ्युम अत्तर बनवण्यासाठी या फुलांचा उपयोग होतो.
फेब्रुवारी ते एप्रिल 2025 या कालावधीत भेट देणाऱ्या पर्यटकांना आसोली गावात राहून एक किंवा दोन दिवशीय सहलीचा आनंद घेता येईल. यामध्ये सुरंगीच्या कळ्या कशा काढल्या जातात हे समजून घेणे, त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणे, स्थानिक कलाकारांसोबत सुरंगीचा वळेसर तयार करणे या सर्व गोष्टींचा आनंद घेता येणार आहे. तसेच जवळपासच्या मंदिरांना, समुद्रकिनाऱ्यांना भेटी, स्थानिक कलाकारांसोबत संवाद, विस्मृतीत गेलेले आठवणीतले खेळ, कांदळवन सफर आणि मनसोक्त शाकाहारी-मांसाहारी भोजन या सर्वांचा आनंद सहभागी पर्यटकांना घेता येणार आहे. सुरंगी फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क जितेंद्र वजराटकर- 9860052383