फिशिंग व्हिलेज हा माझा डिम प्रोजेक्ट आहे त्यामुळे त्याचे काम अतिशय दर्जेदार व्हायला हवे. मांडवी खाडी आणि नवाबाग समुद्राच्या संगमावर हा प्रोजेक्ट होत असल्याने त्याचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व अधिक असणार आहे. या प्रोजेक्टमुळे नवाबागवाडीवासीयांचे जीवनमान बदलावे, असा आपला दृष्टीकोन आहे. येथील स्थानिक महिलांना रोजगार मिळावा, येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक यावेत, इथल्या सी फूडचा त्यांनी आस्वाद घ्यावा या उद्देशाने आपण हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. भविष्यात या प्रोजेक्टमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील व नवाबगवाडीतील घराघरात होम स्टेच्या माध्यमातून ते वास्तव्य करतील. त्यामुळे आपले व्हिजन पूर्ण होण्यासाठी फिशिंग व्हिलेजचे काम दर्जेदार व्हायला हवे, अशा सूचना आमदार दीपक केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व मस्त्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नवाबाग येथे दिल्या.
नवाबाग येथे होऊ घातलेल्या फिशिंग व्हिलेजच्या नियोजित जागेची पाहणी आमदार केसरकर यांनी शनिवारी सायंकाळी केली. चांदा ते बांदा योजनेंतर्गत मत्स्य पर्यटन विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या फिशिंग व्हिलेजसाठी 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी शिंदे सरकारच्या काळात मंजूर झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. हे काम आता प्रत्यक्षात हाती घेण्यात आले असून कामाला वेग देण्यासाठी आमदार केसरकर यांनी स्वतः या कामाच्या ठिकाणी भेट दिली. आरक्षित करण्यात आलेली जागा, तेथील जुन्या जीर्ण झालेल्या इमारतींची पाहणी करत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जागेची मोजमापेही घेतली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, माजी उपसरपंच गणपत केळुसकर, प्रकाश मोटे, दादा केळुसकर, कार्मिस आल्मेडा, कोळंबकर, दशरथ तांडेल आदींसह नवाबागवाडीतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
नवाबागवाडीतील ग्रामस्थांनी यावेळी आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले, फिशिंग व्हिलेजच्या नियोजित जागेच्या पुढेच आमची स्मशानभूमी आहे. त्यामुळे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता करावा. कोणत्याही परिस्थितीत आमची स्मशानभूमी अन्यत्र हलवू नये, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार केसरकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना करून ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्यांना हव्या त्या जागेतून रस्त्याचे नियोजन करा व कामाचा वेग वाढवा. येत्या चार-पाच महिन्यात हे काम पूर्णत्वास येईल, असे नियोजन करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.