महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांना सुरक्षित, सुखकर वेळेत प्रवास देण्याचे वचन दिले आहे. मात्र, महामंडळाला आपल्याच वचनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण महामंडळाच्या बसेस वेळेवर सुटत तर नाहीतच, शियाय लांब पल्ल्याच्या बसेस या प्रवाशांना जेवणासाठी 3 ते 4 वाजता थांबविल्या जातात. महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ 1.30 ते 2 वाजता आहे. पण, प्रवाशांना मात्र 3 ते 4 वा. आणि तेही योग्य सुविधा न मिळणाऱ्या खासगी हॉटेलच्या ठिकाणी आर्थिक भुर्र्दंड पडेल अशा ठिकाणी थांबविल्या जातात. प्रवाशांचा तक्रारीकडे महामंडळाचे पदाधिकारी व अधिकरी हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप ग्राहक पंचायत प्रवासी महासंघाचे वेेंगुर्ले तालुकाध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर यांनी केला आहे.
दरम्यान, जर परिवहन महामंडळाचे पदाधिकारी व अधिकारी म्हणत असतील हे चुकीचे आहे तर राधाकृष्ण वेतुरकर यांनी प्रवाशांच्या तक्रारीनुसार संबंधित ठिकाणी एसटी बसने स्वतः प्रवास करीत प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा अभ्यास करीत महामंडळाच्या प्रवासी सेवेतीत वस्तुस्थिती जनतेसमोर आणून महामंडळाच्या सेवेचे पितळ उघडे पाडले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक बसस्थानकांत लाखो रुपये खर्चुन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी उपहारगृह सुरू केलेली आहेत. या कॅन्टिनच्या माध्यमातून महामंडळाला फायदा होतोच. प्रयाशांना बसस्थानकांतील इतर सोयीमुळे जेवणाबरोबर त्यांचा लाभ घेता येतो. मात्र, बऱ्याच लांब पल्ल्याच्या बसेस या दुपारी 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास बसस्थानकाच्या ठिकाणी न थांबविता त्या दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास खासगी हॉटेलच्या ठिकाणी थांबविल्या जात आहेत. त्या खासगी हॉटेलच्या ठिकाणी बसमधील सर्व प्रवाशांना, बसस्थानकाच्या ठिकाणी ज्या सेवा असतात त्या मिळू शकत नसल्याने प्रवाशांतून महामंडळाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वेंगुर्ले आगारातून सकाळी 7 वाजता निघणाऱ्या वेंगुर्ले-अक्कलकोट व सकाळी 8 वाजता निघणारी वेंगुर्ले-पुणे या लांब पल्ल्याच्या बस आहेत. यातील अक्कलकोट ही बस नागज या खासगी ठिकाणी तर पुणे बस नागोठणे या खासगी ठिकाणी जेवणासाठी दुपारी 3.30 ते 4 या वेळते थांबविली जाते. याच बस दुपारी 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास सांगली किंवा मिरज या बसस्थानकांच्या ठिकाणी थांबविल्यास प्रवाशांना त्या स्थानकातील सेवा-सुविधांसह बस स्थानकातील उपहारगृहातील जेवण घेेता येईल. ते वेळेत मिळाल्याने प्रवाशी समाधानी राहातील.
वेंगुर्लेतून कोल्हापूरला सकाळी 8.50 वाजता जाणारी बस कोल्हापूरहून वेंगुर्ल्यास दुपारी 4.15 वाजता सुटते. कोल्हापूर – वेंगुर्ले बस महामंडळाने प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता बंद केलेली आहे. या बसला कोल्हापूरपासून वेेंगुर्ल्यात येईपर्र्यंत चांगले भारमान असते. पण ती बस बंद करण्यात आलेली आहे. गेली बरीच वर्षे ही बस सुरू असल्याने या मार्गावरील प्रवासी या बसची वाट पाहत असतात. रेल्वेने येणारे प्रवासी कुडाळ बसस्थानकांत वेेंगुर्ल्यात थेट जाणारी बस म्हणून रात्री 8.30 ते 8.45 वाजता वाट पहात असतात. ही बस कोणतीही कल्पना न देता एसटी प्रशासनाने बंद केल्याने प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जर वेंगुर्ले आगाराकडे प्रवासी सेवा देण्यास बस नाहीत, असे असेल तर दररोज सकाळी 11.15 यावेळेत बसगाड्यांचे सामान आणण्यासाठी वेंगुर्ले-कणकवली बस सोडली जाते. या बसमुळे सकाळी 11.30 वाजता सुटणारी वेंगुर्ले-सांगली या बसला भारमान मिळत नाही. त्यामुळे यावेळेत कणकवली बस चालवून महामंडळाचा तोटा का केला जात आहे. याला जबाबदार कोण? यामुळे भविष्यात वेंगुर्ले-सांगली ही बस प्रवासी भारमानाचे कारण दाखवून बंद होण्याची दाट शक्यता असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
महामंडळाच्या काही बसेस वेळेवर सुटतात, पण त्या कुठे व केव्हा बंद पडतील हेही सांगता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे केलेले नियोजन कोलमडते. काही गाड्या या नियोजित वेळेत न सुटल्याने त्यास भारमान मिळत नाही. तरीही त्या गाड्या प्रवासासाठी सोडल्या जातात. त्यामुळे महामंडळाचे नुकसान होत आहे. त्यात केवळ कर्मचाऱ्यांची ड्यूटी व किलोमीटर भरण्याचे काम केले जाते. ही अंदरची बात आहे. बऱ्याच भागात प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस सुरू केल्या जातात, पण काही भागात प्रवाशांसह कोणाचीही मागणी नसताना बसेस सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित बसेसना भारमान मिळत नसल्याने त्या तोट्यात जातात. याबाबत अधिकारी वर्ग ‘हम करोसो कायदा’ या उक्तीप्रमाणे वागत असल्याचे प्रवासी मित्रांचे म्हणणे आहे.
टोकाच्या डेपोतून लांब पल्ल्याची बस सोडली गेली तर त्याचा फायदा टोकाच्या डेपोसह त्या रूटवर असलेल्या सर्व प्रवाशांना घेता येतो. मात्र, मध्येच असलेल्या डेपोतून लांब पल्ल्याची बस सुरू केली तर टोकाच्या बसस्थानकांतून ती बस पकडण्यासाठी त्या प्रवाशांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागतो. एवढे करूनही त्या बसमध्ये लांबचा प्रवास करताना बसण्यासाठी जगाही उपलब्ध होत नाही. याचा विचार महामंडळाने करण्याची गरज आहे. आपल्या जिल्ह्यात वेंगुर्ले, मालवण, देवगड ही टोकाची बसस्थानके आहेत. तेथून लांब पल्ल्याची गाडी कोणत्याही डेपोची सोडण्याची प्रक्रिया या नंतर तरी व्हावी. तसेच वेेंगुर्ल्यातून पुणे येथे जाण्यासाठी रातराणी बसची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक पंचायत प्रवासी महासंघाचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर यांनी केली आहे.
– भरत सातोस्कर, वेंगुर्ला 7588345016