खानोलीतील शेतकऱ्याच्या बागेत डिंकविरहित काजू

वेंगुर्ल्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात चारच महिन्यापूव ‌‘वेेंगुर्ला-10‌’ या काजूचे नवीन वाण विकसित केले होते. ओल्या काजूगरांची वाढती मागणी लक्षात घेऊन संशोधकांनी सलग 15 वर्षे विविध प्रयोग करून हे वाण प्रकाशित केले होते. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात डिंकाचे प्रमाण अत्यल्प आहे. शिवाय गरावरील आवरणही पातळ आहे. त्यामुळे काजूगर सोलणे अत्यंत सुलभ आहे. या ‌‘वेंगुर्ला-10‌’ ला टक्कर देणारे वाण आता खानोलीतील एका शेतकऱ्याच्या बागेत आढळून आले आहे. या काजूचे आवरण ‌‘वेंगुर्ला-10‌’ पेक्षा थोडेशे जाड असले, तरी या काजूत डिंकाचे प्रमाण अजिबातच नाही आणि नेहमीच्या काजूबियांना येणारा गंधही नाही. त्यामुळे वेेंगुर्ल्यात सध्या या काजूची  चर्चा जोरदार सुरू आहे.

      वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावात आंबेसवाडी हेवेचीसखल भागात राहणारे अनंत उर्फ संजू पुंडलिक प्रभू यांच्या बागेत हे काजूचे झाड आहे. त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. अतिशय लकाकी असलेल्या सालीचा कच्चा काजू त्यांनी काही सेकंदात सोलून दाखवला. या ओल्या काजूत डिंकाचे जराही प्रमाण नव्हते. शिवाय नेहमीच्या काजूंना येणाऱ्या गंधाचाही लवलेश नव्हता. मोठा आकार व चवही अप्रतिम असणारा हा काजू आपल्या बागेत पाच सहा वर्षापासून पिकतो आहे, असे ते म्हणाले.

      ‌‘वेंगुर्ला-10‌’ व या काजूमधील नेमका फरक कळावा, यासाठी त्यांनी ‌‘वेंगुर्ला-10‌’ जातीचा ओला काजूही सोलून दाखवला. या काजूमध्ये डिंकाचे थोडेफार प्रमाण आहे. शिवाय त्याला गंधही आहे. प्रभूंच्या बागेतील काजूचे आवरण थोडे जाड असले, तरी त्यात डिंकाचा लवलेश नसल्याने तो सहज तोंडानेही सोलता येतो. प्रभू यांनी या काजूची साल चावूनही दाखविली. खरे म्हणजे काजूच्या टरफलांमध्ये ॲनाकार्डिक ॲसिड असते. हे एक नैसर्गिक औषधी रसायन असले तरी ते थेट हाताळणे सुरक्षित नसते. त्यामुळे ओले काजू सोलून त्यातून गर बाहेर काढणे हे थोडे डोकेदुखीचेच काम असते. हे ॲसिड हाताला लागल्यास बोटांवर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. बरेच दिवस तो निघत नाही. काजूचा हा डिंक त्वचेला लागल्यास काहीजणांना जखमा होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अनेकजण ओला काजूगर खाण्याचेच टाळतात.

      ओल्या काजूगरात्त अनेक औषधी गुणधर्म असल्याने व बाजारपेठेत त्यांना चांगली मागणी असल्याने प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने विशेष संशोधन करून ओल्या काजूंसाठीच म्हणून वेंगुर्ला-10 वाण विकसित केले आहे. याच वाणाच्या बरोबरीने खानीलीतील प्रभू यांच्या बागेत आढळून आलेल्या काजूच्या झाडांमुळे नवीन आशा पल्लवीत झाली आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनीही या झाडाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.

      ओल्या काजूगराची वाढती मागणी पाहता आपल्या बागेत आढळलेल्या या काजूच्या वाणाचा विकास होणे गरजेचे आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने यासाठी पुढाकार घेऊन यावर अधिक संशोधन करावे. आपल्या बागेतील काजूला गंधही नाही आणि डिंकही नाही. त्यामुळे काजू बागायतदारांना हे काजू वाण वरदान ठरू शकेल. कोकणाचे अर्थकारण बऱ्याच अंशी आंबा व काजूवर अवलंबून आहे. मात्र गेली काही वर्षे बदलत्या हवामानाचा फटका बागायतदारांना बसत आहे. ओल्या काजूगरासाठी या वाणाचा विकास झाल्यास शेतकऱ्यांना कमी दिवसात अधिक उत्पन्न मिळू शकते. कारण, ओल्या गरासाठी काजू परिपक्व होण्याची गरज नाही. फलधारणा झाल्यानंतर आठ दहा दिवसापासूनच उत्पन्न सुरू होते. शिवाय या झाडाला मोठ्या प्रमाणावर काजू उत्पादन येते. बाजारपेठेत ओल्या काजूंना मोठ्या प्रमाणात मागणीही आहे. मोठमोठ्या हॉटेल्समध्येही ओले काजू मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. डिंक विरहित काजूमुळे गर काढण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना या वाणाचा फायदाच होईल, असे अनंत उर्फ संजू प्रभू सांगतात.

Leave a Reply

Close Menu