देशात सगळीकडे शिमगोत्सव साजरा केला जात आहे. निरनिराळ्या रंगांची उधळण केली जात आहे, विशेषतः कोकणात याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने राहणारी कोकणी माणसे या शिमगोत्सवाला आपल्या मूळ गावी आपल्या कुटुंबासह उपस्थिती दर्शवितात. त्यानिमित्ताने गावच्या देवाचे दर्शन घेता येते. सारे कुटुंब एकत्रितपणे याचा आनंद लुटतात. या कालावधीत सारे कोकण रंगाच्या उधळणीत आनंदाने न्हाऊन निघते. परंतु, या धुळवडीबरोबरच गेल्या काही महिन्यात राज्यातील राजकीय व सामाजिक धुळवड ज्या नकारात्मकपणे खेळली जात आहे त्याचा राज्यातील संवेदनशील व विवेकी मनाने गांभीर्याने विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यात जे राजकीय व सामाजिक वातावरण निर्माण केले जात आहे, ते राज्यातील कोणाही सुसंस्कृत संवेदनशील विचारसरणीला निश्चितच मानवणारे नाही. राज्यातील या अविवेकीपणाचा राजकीय व सामाजिक वैचारिकतेवर नकारात्मक परिणाम न झाला तर नवलच. त्यामुळे सर्वसामान्य जनता संभ्रमात पडल्याचे दिसून येते. गेल्या काही महिन्यात विद्येचे माहेरघर पुणे व संत भूमी बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व तिला मिळणारा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष राजकीय वरदहस्त यामुळे दुर्दैवाने राज्याची तुलना यू.पी., बिहारसारख्या राज्यांची होऊ लागली आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामीपणाचा वारसा सांगणाया या राज्याला निश्चितच शरमेने मान खाली घालायला लागणारे आहे. राज्यात गेल्या काही वर्षातील कोपर्डी येथे तरूणीवरील अत्याचाराच्या घटनेपासून तो कालपरवाच्या पुणे-स्वारगेट येथील तरूणीवरील अत्याचार प्रकरणांचा इतिहास पाहिला तर राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागताना दिसत आहे, मग त्या महिला अशिक्षित, उच्चशिक्षित, घरकाम करणाया अगर नोकरी-धंदा करणाया असोत. कोणाला ना कोणाला अशा दुर्दैवी प्रसंगांना सामना करावा लागतो. काही घटना समाज पटलावर येतात तर बहुतांशी घटना दुर्दैवाने सामाजिक व राजकीय दहशतीखाली समाज पटलावर येत नाहीत. या दुर्दैवी घटना घडवणाया गुन्हेगारांना ना कायद्याची व पोलिसांची भीती राहिली आहे. महिलांवरील अत्याचाराविरूद्ध शासनाने कडक कायदे करूनही गुन्हेगार अशा घटनांची पुनरावृत्ती कसे करू शकतात? हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे.
राज्यात गेल्या काही कालावधीत ज्या दुर्दैवी घटना घडू लागल्या आहेत. त्याकडे प्रथम मानवतेच्या भावनेतून पाहणे गरजेचे आहे. त्यामधे दुर्दैवाने जातीय व धार्मिक रंग दिला हे टाळणे अत्यंत गरजेचे आहे. अशा घटनांचे चित्रीकरण समाज माध्यमांवर दाखवून किवा त्याबाबत सकारात्मक किवा नकारात्मक चर्चा घडवून आणून समाजात विशेष काही साध्य होत आहे असं दिसत नाही. उलट अशा घटनांचे प्रक्षेपण केल्याने समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतच जाताना दिसते. याला कारण म्हणजे अशा घटनांमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप, दिला जाणारा जातीयतेचा रंग, पुराव्यांचा अभाव, तपासी यंत्रणांवरील वाढत जाणारा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव, न्याय प्रक्रियेतील वाढणारा दबाव यांसारख्या अनेक कारणांमुळे पीडितांना योग्य न्यायापासून वंचित राहावे लागते व खरे गुन्हेगार मोकाट सुटतात. दुर्दैवाने काही गुन्हेगारीचे राजकीय समर्थन केले जाते किवा त्यांच्याशी संलग्न असल्याचे दिसते. असे जर असेल तर ज्या सर्वसामान्य जनतेने आपल्या बहुमूल्य मतांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना निवडून दिले असेल व त्यांच्याकडूनच जर असे वर्तन केले जात असेल तर तो निवडून देणाया जनतेचा घोर अपमान आहे, हे नजरेआड करून चालणार नाही. अशा गुन्हेगारीबाबत शासन केवळ कायद्याने गुन्हेगारांना पकडू शकत नाही तर त्यासाठी समाजानेही प्रगल्भपणे, संवेदनशीलतेने अशा घटनाविरोधी आवाज उठवणे गरजेचे आहे. शासनास व तपासी व न्यायिक यंत्रणेस सहकार्य करणे आवश्यक आहे. केवळ निषेध मोर्चे काढून गुन्हेगारीला आळा बसणार नाही तर त्यासाठी शासन, समाज व न्यायिक यंत्रणा यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. अन्यथा राज्यातील ही राजकीय व सामाजिक धुळवड दिवसेंदिवस रंग उधळत राहून सर्वसामान्य जनतेच्या जीवनाचा बेरंग करताना दिसून येईल. ‘होली है बुरा ना मानो!‘ – संजय तांबे, कणकवली