वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची शासनाच्या वरीष्ठ पातळीवर दखल घेऊन त्यांची नागपूर महानगरपालिकेवर पदोन्नतीने सहाय्यक आयुक्त गट अ या पदावर नियुक्तीने बदली करण्यात आली आहे.
वेंगुर्ला न.प.वर प्रशासन असतानाही आपल्या सव्वादोन महिनांच्या कार्यकाळात श्री. कंकाळ यांनी शहराच्या विकासाची धुरा यशस्वी सांभाळत शहर सौंदर्यकीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांकासह १५ कोटीचे बक्षिस, माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये कोकण विभागात प्रथम (१५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या), १ स्टार मानांक प्राप्त, ओडीएफ डबल प्लस मानांक प्राप्त, माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये कोकण विभागात प्रथम आल्याने ७५ लाखाचे बक्षीस (१५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या) अशी बक्षिसे पटकावत न.प.च्या शिरपेचात नावलौकीकचा तुरा रोवला.
शासनाच्या नगरपरिषदांसाठी आलेल्या परिपत्रकांनुसार प्लॅस्टीक मुक्तीसाठी विशेष मोहिम राबवून १०० टक्के प्लॅस्टीक मुक्तीसाठी यशस्वी प्रयत्न केले. यात प्लॅस्टीक मुक्तीसाठी स्पेशल पथके तयार करून आकस्मिक दुकानांची तपासणी करत दंडात्मक कारवाई सुद्धा केली. माझी वसुंधरा जनजागृती अंतर्गत वेंगुर्ला न.प.च्या स्वच्छ भारत पर्यटन केंद्रात मियावाकी वन व शिल्पाकृती स्थळ उभारण्यात आले आहे.
त्यांच्या कार्यकाळांत केलेल्या विविध स्वरूपाच्या कामात स्वच्छतेतून कच-यापासून बनविलेल्या साधे खत, गांडुळ खत, कोळसाकांडी तसेच विघटन न होणारा कचरा यांची विक्री या माध्यमातून नगरपरिषदेस लाखो रूपयांचे उत्पन्न मिळवून दिलेले आहे. याबरोबरच अत्याधुनिक व्यायाम शाळा, कॅम्प येथील क्रिडा मैदान सुसज्ज, जलतरण तलाव व अग्निशमन केंद्र नुतनीकरणाने सुसज्ज, सुसज्ज असे बँ.नाथ पै समुदाय केंद्र, कॅम्प येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात विविधांगी कार्यक्रम सुरू केल्याने तिथे नाटके व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे स्त्रोत्र सुरू झालेले आहे. परितोष कंकाळ यांची सहाय्यक आयुक्त गट अ या पदावर नियुक्तीने बदली झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.