भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भारतीय राज्यघटनेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, वेंगुर्लेतर्फे संविधान जागृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आपला देश लोकशाही तत्वावर चालणारा आहे. मात्र, लोकशाही मुल्यांचे अवमुल्यन पावलोपावली होऊ लागले आहे. आजचे विद्याथ देशाचे भावी आधारस्तंभ असल्याने त्यांना भारतीय संविधानाचे पावित्र्य कळून यावे, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुलांनी संविधान आणि लोकशाहीचे महत्त्व ओळखावे, यातच सर्वांचे हित सामावले आहे, असे प्रतिपादन जयप्रकाश चमणकर यांनी दाभोली येथे केले.
संविधान जागृती उपक्रमाअंतर्गत वेंगुर्ले एज्युकेशन सोसायटीच्या दाभोलीतील दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, वेंगुर्लेतर्फे संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय? लोकशाहीची मुल्ये याबाबतही मार्गदर्शन कारण्यात आले. आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्ष वृंदा कांबळी, मराठी विषयाचे तज्ज्ञ तथा कोमसापचे पदाधिकारी भरत गावडे, प्रा. पांडुरंग कौलापुरे, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे सचिव महेंद्र मातोंडकर, पदाधिकारी प्रा. डॉ. सुनील भिसे. प्रा. वसंत नंदगिरीकर, लाडू जाधव, आनंदयात्रीचे सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर, प्रितम ओगले, प्रा. सतीश धुरी, दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोन्सुकर, वसंत पवार आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
संविधान प्रास्ताविकेचे अनावरण जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे प्रवक्ते डॉ. सुनील भिसे यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पुढे आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी तसेच भारताचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी लोकशाहीचे अवमुल्यन रोखण्याची गरज व्यक्त केली, असे सांगितले.
लोकशाहीमुळेच सर्वसामान्य जनतेला आपल्या देशात सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. ही लोकशाही नष्ट झाली तर देशात हुकूमशाही येईल. त्यामुळे मुलांमध्ये संविधानाबाबत जागृती होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
प्रा. वसंत नंदगिरीकर यांनीही लोकशाही म्हणजे काय? संविधानाची निर्मिती कशी झाली? संविधानातील ठळक बाबी कोणत्या? संविधानामुळे माणसाला मिळणारे मुलभूत कायदेशीर अधिकार कोणते? संविधानाची गरज व संविधान मुल्यांची व्याप्ती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर यांनी आभार मानले.