वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयासमोर निषेध आंदोलन

वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षकसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तसेच रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वेळोवेळी निवेदने देऊनही शासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या शिष्टमंडळाने 11 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयासमोर शांततेत निषेध आंदोलन छेडले. दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांच्या सूचनेनंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळाशी सुमारे 1 तास चर्चा करून सर्व मागण्यांचे वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव करून 2 महिन्यात सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांच्यावतीने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

      मार्च महिन्यामध्ये नागरिकांच्या शिष्टमंडळाने रुग्णालय प्रशासनाची भेट घेऊन विविध समस्या पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 10 एप्रिल पर्यंत पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार नागरिकांनी निषेध आंदोलन छेडले. यावेळी ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय गावडे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, महेश वेंगुर्लेकर, शिवाजी गावडे, राजन साळगावकर, प्रताप गावस्कर, संतोष पेडणेकर, सिद्धी पेडणेकर, वाल्मिकी कुबल, शरद मेस्त्री, सुहास मांजरेकर, संजय पराडकर, किरण खानोलकर, भाऊ आरोलकर, सुहास तांडेल, अमित कुबल, भालचंद्र भोगटे, उमेश वेंगुर्लेकर, सचिन शिरोडकर, आकांक्षा परब आदी उपस्थित होते. यावेळी आंदोलनास वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विभा खानोलकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

      या निषेध आंदोलन दरम्यान संजय गावडे यांनी प्रशासकीय अधिकारी (मंत्रालय) प्रभाकर आरावंदेकर यांच्याशी संपर्क साधून रुग्णालयातील समस्या, आवश्यक सुविधा याबाबत माहिती दिली. याबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यांची पूर्तता करून वेंगुर्लेवासियांना न्याय देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

      यावेळी झालेल्या बैठकीत नागरिकांनी विविध समस्यांचा पाढाच वाचला. या रुग्णालय एरियात 40 नारळ झाडे व 5 आंब्याची झाडे असून गेली अनेक वर्षे लिलाव प्रक्रिया झाली नाही. याबाबत लिलाव न लावण्या मागचा हेतू काय? असा प्रश्न इर्शाद शेख यांनी उपस्थित केला.

      वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नोकरी लावण्यासाठी संबंधित  ठेकेदाराने एकूण तिघांकडून प्रत्येकी 39 हजार रुपये प्रमाणे रक्कम घेतली. त्यांना 13,500 रुपये देण्याचे मान्य करून केवळ 8,050 रुपये पगार देण्यात आला आहे, असे यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी डॉ. सुबोध इंगळे व नागरिकांच्या शिष्टमंडळांना सांगितले. याबाबत डॉ. इंगळे यांनी वरिष्ठांशी चर्चा केली व ब्लॅक लिस्टबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान येथे एकूण 5 पदे मंजूर असून उर्वरित 2 कंत्राटी कर्मचारी न मिळाल्याने त्यांची नुियक्ती झाली नाही, असे समजते. या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष पुरवावे, अशी नागरिकांच्या शिष्टमंडळाने मागणी केली.

      या रुग्णालयात गेल्या काही कालावधीत काही मद्यपी नागरिकांकडून/रुग्णांकडून त्रास होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी आलेल्या प्रत्येक रुग्णाला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करा, उपलब्ध उपचार करा, चुकीच्या पद्धतीने रुग्ण रेफर न करता क्रिटिकल कंडीशन असेल तरच रुग्ण रेफर करा, यावेळी योग्य समुपदेशन करा अशा सूचना डॉ. इंगळे यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पद हे अत्यावश्यक आहे. शासन स्तरावर 500 तज्ञ डॉक्टर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून येथे तज्ज्ञ डॉक्टर लवकरच उपलब्ध होतील, असे आश्वासन त्यांनी दिले. या आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय येथे पोलीस, होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Close Menu