वेंगुर्ले शहरातील व्यायामपटू दरवष हनुमान जन्मोत्सव दिनी आगळावेगळा अभिषेक करून आगळावेगळा संकल्प पूर्ण करीत आहेत. हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री विरासन हनुमान मंदिर गाडीअड्डा येथे सर्वांच्या वतीने एकत्रित 10 हजार जोर व बैठका मारून हनुमान चरणी अभिषेक संकल्प पूर्ण करण्यात आला. गेली 26 वर्षे सर्वांच्या एकोप्याने या ठिकाणी हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सुरु असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अभिनंदनास पात्र ठरत आहे.
श्री वीरासन हनुमान मंदिर गाडीअड्डा मित्र मंडळ, श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला, युवक शरीरसौष्ठव संवर्धन संस्था वेंगुर्ले यांच्या विद्यमाने वेंगुर्ला गाडीअड्डा येथील डोंगरात असलेल्या हनुमान मंदिरात दरवष अखंडपणे जोर व बैठका मारून हनुमान चरणी अभिषेक संकल्प पूर्ण करण्यात येतो. श्री देव हनुमान जन्मोत्सव निमित्त वेंगुर्ले तालुक्यातील व्यायामपटू, नागरिक तसेच महिलाही उत्साहाने सहभागी होतात. या अभिषेक संकल्पमध्ये आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू किशोर सोनसुरकर, ॲड. मनीष सातार्डेकर, सिंधुदुर्ग श्री विजेते हेमंत चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू अंकित सोनसुरकर, प्रसिद्ध रांगोळीकार पिंटू कुडपकर, व्यायामपटू मनोहर कावले, उद्देश आईर, रघुनाथ आजगावकर, सुधाकर राऊळ, कुणाल वरसकर, अवधूत नाईक, गाडीअड्डा मित्रमंडळाचे पदाधिकारी माजी नायब तहसीलदार बाळा फोवकांडे आदींसह नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बजरंग बली की जय हर हर महादेव, भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात हा संकल्प पूर्ण करण्यात आला. गेली 26 वर्षे येथील उंचावर डोंगरात सकाळी 6 ते 9 वा. या वेळेत सर्वजण एकत्रित दहा हजार जोर व बैठका मारून श्री देव हनुमान चरणी अभिषेक संकल्प पूर्ण करतात. कोरोना कालावधीतही तालुक्यात व्यायामपटूंनी आपापल्या घरी हा संकल्प पूर्ण केला होता.