महाराष्ट्र राज्य हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामीत्वाचा वारसा सांगणारे राज्य आहे, परंतु गेल्या काही वर्षात राज्यातील सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थिती जाती धर्माच्या अहंकारी वृत्तीपायी अस्थिरतेकडे झुकताना दिसते. विशेषतः याची सर्वाधिक झळ कला क्षेत्राला जाणवते. एखादे नाटक अगर सिनेमा असो तो जर कोण्या एका थोर विभुतींच्या जीवन संघर्षावर आधारित असेल तर काही विचारूच नका. त्यातील तत्कालीन ऐतिहासिक प्रसंगांनी समाजातील काही जणांच्या भावना दुखावल्या जातात व त्या कलेवर बंदी आणण्याची मागणी त्या समाजातील तथाकथित नेते मंडळींकडून केली जाते व त्यातून समाजात अस्थिरता निर्माण होते. अशा बाबींचा समाजातील सर्वसामान्य जनतेला काही सोयरसुतक नसतं, त्यांना केवळ अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांची भ्रांत पडलेली असते. राज्यात वाढवणारी महागाई, बेरोजगारी या विषयी जनतेच्या मानत निर्माण होणारी चीड दाबण्यासाठी अशा काही भावनिक व संवेदनशील विषयाला हात घालत जनतेचं लक्ष दुसरीकडे वळविण्याची कला सर्वच पक्षातील नेतृत्वाकडून केली जाते हे नाकारून चालणार नाही.
दि.११ एप्रिल महाराष्ट्रातील एक थोर विभूती, समग्र भारतीय समाजाच्या शिक्षणाचा कोरा झालेला सात-बारा पुनर्बाधीत ठेवण्यासाठी आपल्या जीवाचे रान करून बहुजन समाजाला ज्ञानवंत व गुणवंत करून सोडण्याची प्रतिज्ञा पूर्णत्वास आणणाया क्रांतिसूर्य मत ज्योतीराव फुले यांची १९८वा जयंती उत्सव संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या जयंतीच्या निमित्ताने झी.स्टुडिओज प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किग्ज मेन प्रॉडक्शन निर्मित ‘फुले‘ या हिदी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या मध्ये क्रांतीसूर्य म.ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाज सुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर हा चित्रपट आधारित असून फुले यांच्या जन्मदिनी म्हणजे ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु दुर्दैवाने चित्रपट प्रदर्शित होण्याच्या २ दिवस अगोदरच राज्यातील ब्राम्हण महासंघाने त्यातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याने व त्या दृश्यांवर सुद्धा सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याने हा चित्रपट प्रदर्शना अगोदरच वादाच्या भोव-यात सापडला. ज्या दाम्पत्याने स्री शिक्षणासाठी, जाती निर्मूलनासाठी व सामाजिक समतेसाठी आयुष्यभर झुंज दिली, वंचितांच्या, शेतक-यांच्या हक्कासाठी लढा दिला याचे समग्र चित्रण या चित्रपटाच्याद्वारे करण्यात आल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी म्हटले आहे. या चित्रपटात कोणत्याही समाजाचे एकांगी चित्रण करण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या चित्रपटांवर बंदी आणावी अशी मागणी काही समाजाकडून जोर धरू पाहत आहे.
राज्यात काही वर्षांपासून कोणत्याही कलेबद्दल योग्य ती शहानिशा न करता व्यक्त होण्याची पद्धत रूढ होऊ पाहत आहे व त्यातून सामाजिक भावना दुखावल्या गेल्याचे चित्र निर्माण केले गेल्याने सामाजिक अस्थिरता निर्माण होते. यापूर्वी सुद्धा घाशीराम कोतवाल, नथुराम गोडसे, वस्त्रहरण या नाटकांवर सुद्धा काही काळासाठी बंदी आणली गेली होती. महाराष्ट्राचे लाडके थोर साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या ‘व्यक्ति आणि वल्ली‘ या मधील अंतू बर्वे या पात्राच्या तोंडी असलेल्या म.गांधीजी बद्दलच्या वक्तव्याला सुद्धा काही वर्षांपूर्वी विरोध केला गेला होता.
नुकताच कामरानच्या विडंबनात्मक काव्याला सुद्धा विरोध केला गेला व मोर्चे काढण्यात येऊन त्याच्या स्टुडिओचे नुकसान करण्यात आले. हे सर्व पाहिले की सर्वसामान्यांना असे वाटते की आपण खरोखरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेल्या लोकशाही व्यवस्थेत वावरतो आहोत का? आजकाल स्वातंत्र्याचे संकोचन होताना दिसत आहे. समाजात संकुचित विचारसरणी वाढीस लागताना दिसते व हे निश्चितच देशहितासाठी बाधक आहे. त्याचप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो काही ठिकाणी गैर वापर होताना दिसून येतो त्यावर सुद्धा आळा बसणे गरजेचे आहे. समाजाने ऐतिहासिक सत्य स्वीकारण्याची मानसिकता निर्माण केली तर कोणत्याही कलेबद्दल गैरसमज निर्माण होणार नाही.
– संजय तांबे, कणकवली मोबा. ९४२०२६१८८८