स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहरात गेली बरीच वर्षे सतावत होते ते पाण्याचे संकट. ऐन पर्यटनाच्या हंगामातच पाण्याचा साठा कमी झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. याचा परिणाम मुख्यत्वे करुन हॉटेल व्यावसायीकांमध्ये जाणवत होता. परंतु, पाणीटंचाई मुक्त करण्याच्या घेतलेल्या ध्यासातून अखेर वेंगुर्ला शहर पाणीटंचाई मुक्त झाले आहे. गतवषपासून शहरात पाणी टंचाई भासत नसल्याची माहिती नगरपरिषदेतर्फे देण्यात आली आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निशाण तलावाची अडीच मिटरने वाढवलेली उंची पाणीटंचाई दूर करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरली. तलावाची उंची वाढविल्याने जास्त प्रमाणात पाण्याचा साठा शिल्लक राहिला. त्याचबरोबरच पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण आणि कमकुवत झाली असल्याने फार मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन पाणी वाया जात असे. यासाठी सुमारे 40 वर्षांपूवच्या जुन्या पाईपलाईन बदण्यात आल्या. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाईपलाईनमधून वाया जाणारे पाणी बंद झाले. तसेच जुन्या पाईपलाईनवरचे वॉल्व्ह बदलण्यात आल्यामुळे विविध भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरळीत झाले. तसेच वेशी भटवाडी येथील उंच भागात कमी दाबाने नळ पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तेथे 2017 पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. यावर उपाय म्हणून 1 लाख लिटर पाण्याची टाकी व चंद्रभागा विहिर आदी कामे मंजूर करुन ती पूर्णत्वासही नेली. अग्निशामक केंद्राजवळ 2 लाख लिटर पाण्याची टाकी व विहिर, गाडीअड्डा येथील 50 हजार लिटर पाण्याच्या टाकीजवळ नवीन विंधन विहिर बांधण्यात आली. नारायण तलावाच्या जवळील असलेल्या विहिरीची खोली वाढविली. आनंदवाडी येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली. विहिरी आणि बोअरवेल यांची साफसफाई, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सर्व कामांमुळे वेंगुर्ला शहर आज पाणी टंचाई मुक्त झाले आहे.
वेंगुर्ला नगरपरिषद सद्यस्थितीत रोज 10 लाख लिटर पाणी पुरवठा करीत आहे. 15 जुनपर्यंत नागरिकांना पाणी पुरवठा होईल अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे. पाऊस लांबणीवर गेल्यास आवश्यकतेनुसार तिलारीच्या पाण्याची मदत घेण्यात येणार आहे. शहरात एकूण 1250 नळधारक असून 96 टक्के पाण्याच्या कराची वसुली करण्यात आली आहे.
भविष्यात नारायण तलावाचे पुर्नजिवीकरण करण्याचा मानस असून यासाठी 5 कोटींच्या निधीची मागणी शासनस्तरावर केली आहे. तर शहरातील दाभोली नाक्यापर्यंत आलेले तिलारीचे पाणी निमुजगा येथील पाण्याच्या टाकीपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. या सर्व उपायांना यश आल्यास शहरात मुबलक पाणी साठा उपलब्ध होणार आहे.
फेब्रुवारी महिना सुरू झाला की, पाणीटंचाई भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची गाथा गावागावातून निदर्शनास यायला सुरुवात होते. पण गेल्या काही वर्षांपासून वेंगुर्ला शहराला नळ पाणी योजनेद्वारे नियमित पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही वर्षाच्या सातत्यपूर्ण नियोजनामुळे हा सकारात्मक बदल नागरिकांच्या आयुष्यामध्ये घडला आहे. सिंधुदुर्गातील अन्य नगरपरिषदा आणि त्यांच्या पाणीपुरवठ्याची स्थिती यांच्याशी तुलना केली असता वेंगुर्ला शहराला निश्चितच नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत आहे.
एकूणच वाढत्या उन्हाच्या झळा आणि बदलते हवामान याचा विचार करता नागरिकांनी देखील जपून पाणी वापरले पाहिजे. कारण पाणी हे केवळ मानवाच्या गरजेपुरता मर्यादित नसून संपूर्ण जीवसृष्टीसाठी अत्यावश्यक आहे. वन्यजीव, पशुपक्षी, प्राणीमात्र यांचं जीवनदेखील पाण्यावरच अवलंबून आहे.
प्रत्येक वष बंधारे घालणे आणि नळ पाणी योजनेवर देखरेख ठेवणे ही सातत्यपूर्ण कामे करावीच लागणार आहेत. लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य असेल तर वेंगुर्ल्याप्रमाणेच प्रत्येक शहर, गाव पाणीपुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण होऊ शकते.