वेंगुर्ला आगार वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराविरोधात तसेच त्यांच्या तात्काळा बदलीसाठी १ मेपासून सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाकडून वेंगुर्ला आगाराच्या बाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज दुस-या दिवशीही हे उपोषण सुरूच होते.
दरम्यान, याच हुकुमशाही विरोधात सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाकडून २६ जानेवारी रोजी उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी वेंगुर्ला तहसीलदार, आगारप्रमुख, वरिष्ठ अधिकारी यांनी तत्काळ अहवाल पाठवून कारवाईचे करण्याचे आश्वासन कर्मचा-यांना दिले होते. पण गेल्या तीन महिन्यात कारवाई अथवा लेखी स्वरूपात पत्र न दिल्यामुळे एसटी कर्मचारी संघाकडून १ मे रोजी पुन्हा आमरण उपोषण करण्यात आले आहे. जोपर्यंत आगार वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांची तात्काळ बदली होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू ठेवण्याचा इशारा सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाकडून देण्यात आला आहे.
आगार वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्याकडून एसटी कर्मचायांना गेल्या काही महिन्यात होणारा मानसिक त्रास, शिवीगाळ, धमकावणे असे १६ मुद्दे असलेली प्रत पुरावे प्रशासनाला देऊनही त्यांच्याकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही किंवा कुठलेही कारवाई केली गेली नाही मग हे नियम अटी फक्त चालक, वाहक, यांत्रिकसाठीच आहेत का? अधिकारी त्यात का डावलले जातोय असे प्रश्न या संघटनेकडून उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे हे उपोषण सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विभागीय सचिव भरत चव्हाण, आगार सचिव दाजी तळवणेकर, विभागीय सहसचिव स्वप्नील रजपूत, आगार उपाध्यक्ष सखाराम सावंत, विभागीय सदस्य महादेव भगत आदी उपस्थित होते. सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या या उपोषणाला भाजपाचे पदाधिकारी सुहास गवंडळकर यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.