पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, तरंग देवतांच्या उपस्थितीत भव्य रथातून श्री देव रवळनाथाचा कलश भक्तिमय वातावरणात भाविकांच्या सहभागात वेंगुर्ले शहरातून मिरवणूक काढत मंदिरापर्यंत आणण्यात आला. चार दिवस चाललेला हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
वेंगुर्ले येथील श्री देव रवळनाथ आणि परिवार देवता आर्चाशुद्धी, संप्रोक्षण, कलशारोहण व महारूद्र सोहळ्याला सोमवार पासून प्रारंभ झाला. यानिमित्त रविवार 27 रोजी सायंकाळी कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयापासून या कलश मिरवणुकीला प्रारंभ झाला.
या मिरवणुकीत आवळेगाव येथील लक्ष्मी-नारायण महिला ढोलपथक सहभागी झाले होते. ही मिरवणूक बॅ. बाळासाहेब खर्डेकर मार्गाने हॉस्पिटल नाका मार्गे श्री सातेरी मंदिर येथे आली. तेथे आल्यावर देवीला श्रीफळ ठेवण्यात आले. तरंगदेवतांसहीत पुढे ही पालखी राऊळवाडा अशी जाताना मार्गात श्री रवळनाथ पालखीचेही मिरवणुकीत आगमन झाले. त्यानंतर श्री देव रामेश्वर मंदिरमार्गे श्री देव रवळनाथ मंदिरापर्यंत तरंगदेवता व कलशाची सवाद्य या मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकीत भाविक बहुसंख्येने सहभागी झाले होते.
आर्चाशुद्धी, संप्रोक्षण, कलशारोहण व महारूद्र सोहळा 28 एप्रिल ते 1 मे या कालावधीत उत्साहात संपन्न झाला. 28 रोजी सकाळी देवतांना व शिखर कलशाला जलाधिवास, वास्तू हवन, नैवेद्य प्रसाद, सायंकाळी 7 वा. स्थानिक मंडळांची संगीत व वारकरी भजने, 29 रोजी सायं. 7 वा. श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ले यांचे नाटक झाले. 30 रोजी सकाळी 6.30 वा. देवता प्राणप्रतिष्ठा, 7.45 वा. अवसारी देवतांच्या उपस्थितीत शिखर कलश स्थापना करण्यात आली. 8.45 वा. महापूजा, 7.30 वा. महारूद्र प्रारभ, बलिदान, पूर्णाहूती, अभिषेक, नैवेद्य, सायंकाळी 7 वा. ह.भ.प. महेशबुवा काणे (चिपळूण) यांचे गरूड गर्वहरण यावर कीर्तन सादर झाले.
1 मे रोजी सकाळी 7.30 वा. रवळनाथ आदी देवता महापूजा, लघुरुद्र, हवन, बलिदान, पूर्णाहूती, श्री सत्यनारायण महापूजा, महानैवेद्य, आरती, दुपारी 1 पासून महाप्रसाद, सायंकाळी 7 वा. तेंडोलकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक संपन्न झाले.