अफवांच्या अंधारात हरवलेला मीडिया

ऑपरेशन सिंदूर‘ या भारतीय सैन्यदलाच्या धाडसी आणि अचूक कारवाईने संपूर्ण देशात देशाभिमान आणि आत्मविश्वासाचं वातावरण तयार झालं. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संयम राखून, परंतु प्रभावी पद्धतीने दिलेलं प्रत्युत्तर केवळ लष्करी ताकदीचं नव्हे, तर धोरणात्मक परिपक्वतेचंही प्रतिक होतं. ही कारवाई अत्यंत सूक्ष्म नियोजनात आणि मर्यादित स्वरूपात पार पडली. सैन्यदलांनी केवळ दहशतवादी तळांवर लक्ष्य साधलं, कोणत्याही नागरी वस्त्यांना हानी पोहोचू दिली नाही, हा संयम भारतीय सैन्य दलाने बाळगला. सर्वपक्षीय बैठकीत दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सर्वजण एकत्र आहोत, हा संदेशही दिला गेला. देशातील ब­याच घटकांनी या संपूर्ण घटनेची तत्त्वतः योग्य प्रतिक्रिया दिली असतानाच काही इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी आणि समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या लोकांनी ज्या पद्धतीने खळबळजनक, बिनबुडाच्या बातम्यांचा आणि अफवांचा धुमाकूळ घातला, ती बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.

    दुर्दैवाने आजची काही इलेक्ट्राॅनिक माध्यमं ‘वृत्तसंस्था‘ म्हणून नव्हे, तर ‘मनोरंजन वाहिनी‘ म्हणून वावरताना दिसत आहेत. या माध्यमांनी ‘भारतीय नौदलाने कराची उद्ध्वस्त केली‘, ‘पाकिस्तानी लष्करप्रमुख तुर्कीत पळून गेले‘, ‘भारताने एलओसी ओलांडून पाकिस्तानी शहरे ताब्यात घेतली‘, ‘पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राजीनामा दिला‘, अशा वाटेल तशा बातम्या चालवून आपल्या कल्पनाशक्तीला बहर दिला. बातम्यांचे मथळे हे चित्रपटांच्या ट्रेलरप्रमाणे ठरवले जात होते. कोणताही अधिकृत स्रोत, कोणतीही सत्यता न तपासता हे सर्व देशभर आणि सीमापारही प्रसारित होत होते. जेव्हा देश युद्धसदृश वातावरणात असतो, तेव्हा लष्कराच्या प्रत्येक हालचालीवर, रणनीतीवर गुप्ततेचे काटेकोर नियम असतात. अशावेळी या वाहिन्यांनी जे काही प्रसारित केलं, त्यातून केवळ दिशाभूलच झाली नाही, तर काही प्रमाणात देशाच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला.

       ही कारवाई भारताने अत्यंत मर्यादित उद्देशाने आणि स्पष्ट संदेश देण्यासाठी केली होती. ज्यामध्ये देशाविरोधात दहशतवाद स्वीकारला जाणार नाही आणि भारताच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जाऊ नये, हा एकमात्र उद्देश होता. मात्र ही बाब नीट समजून न घेता काही माध्यमांनी रणगर्जना सुरू केल्या. एकीकडे सैन्यदल संयम राखत होतं, दुसरीकडे देशातील काही वाहिन्या युद्धज्वर तापवत होत्या. या सगळ्याचा परिणाम सीमावर्ती भागांतील नागरिकांवर, लष्करी कुटुंबांवर आणि देशातील सामान्य जनतेच्या मानसिकतेवर होत होता. लोकांच्या मनात भीती, संभ्रम आणि अस्थिरता निर्माण होत होती. माहितीच्या नावाखाली अफवांची धुंदी पसरवली जात होती.

   समाजमाध्यमांवरील परिस्थिती याहूनही बिकट होती. कोणीही कुठूनही एक ‘ब्रेक्रिग न्यूज‘ म्हणून कुठलीही माहिती शेअर करत होते. व्हिडीओ, फोटो, बनावट क्लिप्स यांचा वापर करून खोट्या बातम्यांना प्रतिष्ठा दिली जात होती. ‘बलुचिस्तानमधून बलुची बंडखोर पाकिस्तानवर चाल करून आले‘, ‘भारताने पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाबूत केलं‘, ‘इस्लामाबादवर भारताचा ताबा‘, अशा असत्य गोष्टी प्रचंड वेगाने पसरत होत्या. यातून केवळ विनोद किंवा करमणूक होत नव्हती, तर हे सगळं एक आपल्याच नागरिकांकडून आपल्याच देशाविरूद्ध मानसिक युद्ध तयार होत होतं. या अफवांनी लष्कराच्या कारवाईची गंभीरता कमी केली, सरकारच्या धोरणात्मक निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळेच संरक्षण मंत्रालयाला थेट निवेदन काढून माध्यमांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागली. ‘कोणतीही लष्करी माहिती अचूकपणे आणि अधिकृत स्रोतांवरूनच दिली जावी‘, ‘सैन्याच्या हालचाली, योजना, थेट कारवाया याबद्दलची दृश्ये सार्वजनिक करू नयेत‘, ‘कारगिल युद्ध आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळेच्या चुका लक्षात ठेवाव्यात‘, असा स्पष्ट इशारा सरकारला द्यावा लागला. ही बाब संबंधित माध्यमांसाठी लज्जास्पद आहे.

   पत्रकारितेचं काम सत्य शोधून ते जबाबदारीने सादर करण्याचं आहे. माध्यमांचं काम अफवा पसरवणं नाही, उलट अशा अफवांना थांबवणं हेच त्यांचं नैतिक कर्तव्य आहे. नागरिक म्हणूनही आपली जबाबदारी आहे. कोणतीही बातमी पाहिल्यावर किवा ऐकल्यावर तात्काळ तिचा प्रचार करण्याऐवजी तिची खातरजमा करणं, सामाजिक सलोखा बिघडेल, द्वेष वाढेल अशा शब्दांचा वापर टाळणं, लष्कराच्या मनोधैर्याला मारक ठरेल अशा पोस्टर्स वा प्रतिक्रियांपासून दूर राहणं, हे सगळं आपल्या विवेकाचे लक्षण आहे.

   युद्ध चालू असो वा नसो, देशाची सुरक्षा ही केवळ सीमारेषेवरील लढ्याने निश्चित होत नाही, ती देशांतर्गत स्थैर्याने ठरते. आज आपल्या सैन्यदलांनी जे संयम, शिस्त, अचूकता आणि  राष्ट्रनिष्ठा दाखवली, तिच शिस्त आणि जबाबदारी आपणही समाजमाध्यमांवर दाखवायला हवी. केवळ टीआरपी मिळवण्यासाठी आणि काही क्षणांच्या प्रसिद्धीसाठी देशाची प्रतिष्ठा आणि सुरक्षेची किंमत मोजणं ही अक्षम्य चूक आहे. हे लक्षात घेतल्यासच आपण ख­या अर्थाने जागरूक नागरिक म्हणवू शकतो.

    अशा अफवांच्या अंधारात देश भरकटू नये, म्हणून आता आपल्याला सजगपणे आरसा बघायची वेळ आली आहे. हा आरसा म्हणजे आपल्या वर्तनाचा, आपल्या प्रतिक्रियांचा आणि आपल्या जबाबदारीच्या जाणिवेचा. लष्कर सीमांवर लढत असताना आपल्याला सोशल मीडियाच्या रणांगणावर संयमाने आणि शहाणपणाने लढावं लागेल. माहिती आणि भावना यांच्या सीमारेषा ओलांडल्या की, भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण तयार होतं. ते आपणच वाढवत आहोत का, याचाही विचार व्हायला हवा. देशभक्ती ही केवळ घोषणांनी नव्हे, तर जबाबदारीनं उभी राहते. खरी राष्ट्रसेवा कधी कधी पोस्ट न करता शांत राहण्यातही असते. हा विचार मनात सातत्याने तेवत ठेवायला हवा.

 

 

Leave a Reply

Close Menu