आपले संपूर्ण आयुष्य दशावतार कलेल्या उत्कर्षासाठी व्यथीत केलेले तुळस गावचे सुपुत्र तुलसी बेहेरे यांचा जन्मदिवस कुंभारटेंब येथील त्यांच्या वरद निवासस्थानी बेहेरे कुटुंबीय आणि तुळस ग्रामस्थांतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाच्या सुजाता पडवळ, माजी सरपंच विजय रेडकर, ग्रा.पं.सदस्य नारायण कुंभार, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य महेंद्र मातोंडकर, प्राथमिक शिक्षक श्याम कुंभार, ‘भाव अंतरीचे हळवे‘ फेम मयुर गवळी, मुंबईतील सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचे संचालक शंकर मेस्त्री, संजू तांडेल, प्रा.रेखा बेहेरे, तन्मयी बेहेरे आदी उपस्थित होते.
दशावतारावर पीएचडी करून दशावतारी लोककला सर्वदूर पोहोचविणारे डॉ. तुळशीदास उर्फ तुलसी बेहेरे हे दशावताराचे चालते-बोलते विद्यापीठ होते. दशावतारी कला आणि दशावतारी कलावंतांना शासनदरबारी राजाश्रय मिळावा यासाठी ते सातत्याने धडपडत राहिले. ते केवळ दशावताराचे अभ्यासक नव्हते तर दशावतार जगत होते. दशावतार पूर्णपणे मुखोद्गत असणारे बेहेरे दशावताराचे खया अर्थाने उद्धारक होते, असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
मान्यवरांचे स्वागत बेहेरे कुटुंबातील छोट्या मंडळीने केले, तर आभार स्नेहा बेहेरे यांनी मानले. त्यानंतर डॉ. तुलसी बेहेरे यांनी मुंबई येथे स्थापन केलेल्या मुंबईतील सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाच्या कलाकारांनी ‘नारायणी नमोस्तुते‘ हा नाट्यप्रयोग सादर केला. या नाट्यप्रयोगाला रसिकांनी प्रतिसाद दिला.