वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्थापनेला २५ मे २०२६ रोजी १५० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कार्यक्रमांचा शुभारंभ २५ मे रोजी भाजपाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष तथा सिधुदुर्गचे माजी पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या हस्ते मधुसूदन कालेलकर सभागृहात करण्यात आला. देशात स्वच्छतेसाठी सर्वाधिक बक्षिसे प्राप्त करणारी वेंगुर्ला ही एकमेव नगरपरिषद आहे. मिळालेले यश टिकवून ठेवणे फार जबाबदारीचे काम आहे आणि वेंगुर्ल्यातील नागरिक ही जबाबदारी मोठ्या जिद्दीने पार पाडतील. शहरात मोठ्या प्रमाणावर विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्या टिकवून ठेवण्यासाठी स्वतंत्र नियोजनाची गरज आहे. भविष्यातही वेंगुर्ल्याच्या उद्धारासाठी आपण सोबत असल्याचे प्रतिपादन रविद्र चव्हाण यांनी केले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपाचे शरद चव्हाण, प्रभाकर सावंत, प्रसन्ना देसाई, श्वेता कोरगांवकर, विष्णू परब, सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जगन्नाथ सावंत, नम्रता कुबल, डॉ.पूजा कर्पे, सुनिल डुबळे, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, अभिषेक वेंगुर्लेकर, शितल आंगचेकर, माजी नगरसेवक उमेश येरम, अॅड.सुषम प्रभूखानोलकर, साक्षी पेडणेकर यांच्यासह सचिन वालावलकर, सुजाता पडवळ, सुजाता देसाई, वसंत तांडेल, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल आदी उपस्थित होते.
शहरातील विविध महत्त्वपूर्ण कामांसाठी १५ कोटींचा निधी मिळावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हा निधी मंजूर व्हावा यासाठी रविद्र चव्हाण यांनीही सहकार्य करावे अशी विनंती दिलीप गिरप यांनी केली. लौकिकप्राप्त नगरपरिषदेचा मुख्याधिकारी होण्याचा मान मला मिळाला. हे मी माझे भाग्य समजतो असे मुख्याधिकारी किरूळकर यांनी सांगत पालिकेचा लौकिक कायम ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘स्वच्छता दूत‘ म्हणून ‘माझा वेंगुर्ला‘चे सचिव राजन गावडे यांचा रविद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.