दादा मडकईकर यांच्या ‌‘सुर्र्गेंचो वळेसार‌’ काव्यसंग्रहाचे मुंबईत प्रकाशन

“संपूर्ण महाराष्ट्रात दादा मडकईकर हे एकमेव प्रसिद्ध उत्कृष्ट मालवणी कवी आहेत. ते आपल्या कवितेतून जगासमोर मालवणी भाषा उभी करून मालवणी संस्कृती, मालवणी बोली लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करत आहेत. हे त्यांचं कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे”, असे गौरवोद्वार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी काढले. मालवणी कवी दादा मडकईकर यांचा सुर्र्गेंचो वळेसार हा मालवणी काव्यसंग्रह व 450 म्हणींच्या संग्रहाचे प्रकाशन ॲड. शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. पु. ल. देशपांडे साहित्य अकादमी, लोककला दालन, प्रभादेवी, मुंबई येथे हा सोहळा संपन्न झाला.

      ‌‘सुर्र्गेेंचो वळेसार‌’ या पुस्तकात केवळ शब्द नाहीत, तर कोकणातील मातीचा सुगंध, मालवणी भाषेचा गोडवा आणि पारंपरिक संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. हा काव्यसंग्रह मालवणी बोलीच्या जतनासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. त्यांच्या कविता आणि म्हणी ऐकताना कोकण उभं राहतं. खरंतर संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगाला हेवा वाटेल, असे त्यांचे कार्य आहे. दादा मडकईकर यांनी ‌‘चांन्याची फुला‌’, ‌‘आबोलेचो वळेसार‌’, ‌‘कोकण हिरवेगार‌’ असे मालवणी काव्यसंग्रह लिहिले असून आपल्या खास शैलीन रसिकांच्या हृदयात वेगळं स्थान या काव्यसंग्रहांनी निर्माण केलं आहे. कोकणातली लोकसंस्कृती, सणवार, परंपरा, लोककला आणि इथला निसर्ग त्यांनी आपल्या काव्यातून उलगडला आहे. त्यांचा सुर्र्गेंचो वळेसार हा काव्यसंग्रह मालवणी बोलीच्या जतनासाठी तसेच भाषा, बोलीच्या अभ्यास, संशोधनासाठी उपयुक्त ठरेल, असे उद्गार मंत्री शेलार यांनी याप्रसंगी काढले.

      कोकण हा हृदयाच्या अगदी जवळचा विषय असून त्याच्या समृद्ध परंपरेचं संचित अशा पुस्तकाद्वारे नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे, ही खरोखरच अभिमानास्पद आणि भावनिक गोष्ट असल्याचे दादा मडकईकर यांनी सांगितले. यावेळी कवी त्यांनी ‌‘छान किती दिसते फुलपाखरू‌’ कविता सादर केली. कवितेवर प्रेम आहे त्यात मालवणी भाषेत कविता गाणे खूपच वेगळा अनुभव आहे. मी कुठेही गेलो, तरी मालवणी भाषेतच बोलतो, एवढं माझ मालवणी भाषेवर अफाट प्रेम आहे, असं सांगत त्यांनी ‌‘पाऊस ईलो पाऊस‌’ अशा मालवणी भाषेत पावसावर कविता गात उपस्थित मुंबईवासीयांना अक्षरशः कोकणची सैर करीत मालवणी भाषेमध्ये किती गोडवा आहे हे दाखवून दिले.

      त्यांनी कोकणचा पाऊस कसा पडतो, हे कवितेतून सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यातून कोकणातील चालीरिती आणि राहणीमान कसे आहे हे उलगडून सांगितले. मी या माझ्या मालवणी गीतातून आनंद देत आहे, हेच मला खूप समाधान देते, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Close Menu