शिवसेना पक्ष नेहमीच 80 टक्के समाजकारण करतो. त्याचाच एक भाग म्हणजे ही प्रशिक्षण कार्यशाळा आहे. या प्रशिक्षणातून कोकणात नवउद्योजक घडतील व उद्योगांसाठी पुढे येतील याची खात्री आहे. या माध्यमातून कोकणातील रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षाचे नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ येथील ‘फणस एक, व्यवसाय संधी अनेक’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
शिवसेना पक्षातर्फे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील कोकणवासीयांसाठी ‘उद्योगावर बोलू काही’ या शीर्षकांतर्गत ‘फणस एक, व्यवसाय संधी अनेक’ या विषयावरील निःशुल्क प्रशिक्षण कार्यशाळा नुकत्याच घेण्यात आल्या. कुडाळ आणि रत्नागिरी अशा दोन्ही ठिकाणच्या कार्यशाळांना चांगला प्रतिसाद मिळाला. दोन्ही कार्यशाळांचा शुभारंभ माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यशाळेचा सर्वांनी फायदा करून घ्यावा तसेच कोकणात जास्तीत जास्त उद्योजक तयार व्हावेत, असे राऊत या वेळी म्हणाले.
कोकणात आंब्यानंतर फणसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फणसापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांना मोठी मागणी आहे, मात्र फणसापासून उत्पादित पदार्थ व त्यांची विक्री याबाबतची आपल्याकडील उदासीनता लक्षात घेऊन त्याबाबतची व्यवसाय संधी विषद करण्यासाठी कुडाळ व रत्नागिरी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेची भूमिका आणि निर्मित उत्पादनांसाठी मार्केटिंगच्या साखळीपर्यंतची तपशीलवार माहिती शिवसेना उपनेत्या, माविमच्या माजी अध्यक्षा तथा या कार्यक्रमाच्या संकल्पक डॉ. सौ. ज्योती ठाकरे यांनी आपल्या प्रस्तावनेतून उपस्थितांना दिली. यंत्र उद्योजक तथा उत्कर्ष उद्योजक संस्थेचे अध्यक्ष गणेश भांबे यांनी फणस प्रक्रियेसंदर्भात प्रोजेक्टरद्वारे विस्तृत माहिती दिली, तर या उद्योगासाठी मदतरूप ठरणाऱ्या शासकीय योजना, कर्ज प्रक्रियेचे प्रस्ताव व अनुदानाची परिपूर्ण माहिती एमसीईडीचे निवृत्त राज्यप्रमुख सुनील देसाई यांनी या वेळी दिली. या क्षेत्रात उद्योग करू इच्छिणाऱ्या महिला-पुरुष व नवउद्योजकांनी भर पावसातही उपस्थित राहून कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कुडाळ येथे सीमा मराठे, तर रत्नागिरी येथे लिमये यांनी आपले अनुभव कथन केले. सहभागी प्रशिक्षणाथनी या उपक्रमाबाबत आपले मनोगत मांडून या उपक्रमाची गरज असल्याचे प्रकर्षाने सांगत आयोजकांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी आमदार वैभव नाईक, लोकसभा संपर्क संघटक नेहा माने, विधानसभा संघटक अपूर्वा प्रभू, जिल्हा युवाधिकारी मंदार शिरसाट, महिला आघाडी जिल्हा संघटक श्रेया परब, वेदा फडके यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.