श्री मठ संस्थान दाभोली, कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ पूर्णांनंद सेवा समितीतर्फे तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, उमेश गाळवणकर व वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालय, वालावलकर रूग्णालय डेरवण यांच्या सहकार्याने वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयात २५ मे रोजी मोफत भव्य बहुद्देशिय वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. याचा १९८ जणांनी लाभ घेतला. उद्घाटनप्रसंगी उद्योजक रविद्र सामंत, सौ.स्वरूपा सामंत, फोंडा-गोवा येथील उद्योजक वि.तू.प्रभू, सुरेश सामंत (कणकवली), दै.तरूण भारतचे संपादक शेखर सामंत, जिल्हा रूग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.शाम पाटील, वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रविद्र लिलके, बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, पूर्णानंद सेवा समितीचे तसेच कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ अध्यक्ष योगेश सामंत, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर आदी उपस्थित होते.
सिधुदुर्ग-रत्नागिरी हा एकच जिल्हा होता.त्यावेळी वेंगुर्ला येथील सेंटलुक्स रूग्णालयात मोठ्या प्रमाणात रूग्णांवर उपचार व्हायचे. येथे येणाया अनेक रूग्णांना माझे वडील आणि काका हे सर्वोतोपरी मदत करायचे. तेच बाळकडू आज आमच्यात आले आहे, असे विचार रविद्र सामंत यांनी व्यक्त केले. धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे बनले आहे. सुदृढ आरोग्य ही यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे. त्यामुळे सर्वांनी अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन वि.तू.प्रभू यांनी केले. या शिबिरात कर्करोग, स्त्रीरोग, जनरल सर्जन, अस्थिरोग, कान-नाक-घसा, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग आदी रूग्णांची तपासणी, मोफत एक्सरे, ईसीजी व रक्त तपासणी तर फिझिओथेरपी व अॅक्यूप्रेशरबाबत मार्गदर्शन व मोफत चष्माचेही वाटप केले. तपासणीसाठी डॉ.अर्जून पांडव, डॉ.सावंत, डॉ.अर्थव मुळे, डॉ.परमेश्वर पवार, डॉ.प्रत्युश बिस्वाल, डॉ.प्रद्युमन राघोजी, डॉ.प्रेरणा राठी, डॉ.इमिता गिरोल्ला या डॉक्टरांनी सहकार्य केले.