जिल्ह्यात गेली काही वर्षे माझ्या क्षमतेनुसार सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क येतो. आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा कोणताही बाऊ न करता किंवा अतिरेक न करता केलेला वापर जेव्हा मला काहीतरी रचनात्मक करायचे आहे असा सकारात्मक विचार करून जेव्हा एखादे अधिकारी काम करतात तेव्हा त्या अधिकाऱ्याशी अगदी शेवटचा दुर्लक्षित घटकही आपोआप मनापासून जोडला जातो. त्याचे अतिशय चांगले परिणाम समाज मनावर झालेले आपल्याला पहायला मिळतात.
असेच एक संवेदनशील अधिकारी ज्यांची चांगली अनुभूती अनुभवायला मिळाली ते म्हणजे आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सौरभजी अग्रवाल साहेब. ते मुळ राजस्थानचे पण भाषा हे माणसाला जोडणारा एक भक्कम दुवा आहे हे त्यांना पूर्ण माहित होते. त्यामुळे या जिल्ह्यात काम करत असताना भाषेची अडचण त्यांना मुळीच आली नाही. मराठी भाषा त्यांना बोलता येते व वाचताही येते. मी पाठवलेल्या प्रत्येक पोस्टवर त्यांचा प्रतिसाद असतोच ज्या मराठीत असतात.
अडीच वर्षांपूव या जिल्ह्यात ते आले. त्यांच्याच काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडल्या. त्यांचे विशेष कौतुक म्हणजे राजकोट येथे उभारलेला शिवछत्रपतींच्या पुतळ्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर जो संघर्ष निर्माण झाला ती परिस्थिती ज्या संयमाने साहेबांनी हाताळली ती खरोखरच कौतुकास्पद होती. मोठ्या पदावर आणि विशेषतः कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असताना राजकीय दबाव व त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणीना सामोरे जाणे फारच त्रासदायक असते. पण आपल्या अडीच वर्षाच्या कारकिदत त्यांनी हाताळलेली परिस्थिती आणि त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घेतलेली काळजी हे चोख प्रशाशनाचे द्योतक आहे.
काही दिवसांपूव त्यांनी एका ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमात अस्सल मराठी भाषेत केलेले संबोधन त्यांच्या सामाजिक भानाचा अनुभव देणारे होते. ते म्हणाले होते, “अधिकारी हा सुद्धा तुमच्या सारखाच माणूस आहे. आपले कर्तव्य निभावत असताना जर समाजातील प्रत्येक घटकांशी योग्य संवाद आणि समन्वय राखला तर त्या अधिकाऱ्यालाही काम करणे सहज सोपे जाते. आपल्याकडे येणाऱ्यांच्या अडचणी समजून घ्या आणि त्यांना मदत करा. जेव्हा असे विश्वासाचे नाते आपण निर्माण करू तेव्हा अनेक जटिल समस्या चुटकीसरशी सुटतील” एवढा सकारात्मक व आशावादी विचार तोच अधिकारी मांडू शकतो जो अशा विचाराने मार्गक्रमण करतो.
या जिल्ह्यात साहेबांनी काम करताना वंचित आणि दुर्लक्षित घटकांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या वेताळ बांबार्डे येथील नाग्या म्हादू वसतिगृहात जेव्हा आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून दोन अडीच तास त्या कातकरी समाजाच्या मुलामध्ये घालवतात.. त्यांच्या बरोबर समरस होतात आणि त्या मुलानां छातीशी कवटाळतात हे दुमळ चित्र ज्या पोलीस खात्याकडे आपण एका वेगळ्या नजरेने पाहतो त्यासाठी हे खूपच आशादायी आहे. साहेबांची या कातकरी समाजाच्या वसतिगृहाला भेट झाल्यावर दोन महिन्यांनी त्या नवीन वसतिगृहाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला गेलो होतो. तेव्हा त्या वसतिगृहातील एका बारा वर्षाच्या मुलाला मी प्रश्न विचारला की, “भविष्यात तू कोण होणार?” तो मुलगा म्हणाला, “मला पोलीस अधिकारी व्हायचे आहे…” हा प्रभाव साहेबांच्या कृतीचा आणि विचारांचा होता.
ज्येष्ठ नागरिकांना भेटल्यावर तर साहेब सांगायचे की रात्री अपरात्री कोणत्याही प्रकारची अडचण येऊद्या आपण डायरेक्ट मला फोन करायचा. सरकारने तुमच्या सुरक्षेसाठीच मला नेमलेले आहे. मोठ्या पदावर असलेले अधिकारी हे राजकीय नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना सहजपणे भेट देतात पण अग्रवाल साहेब हे अगदी सामान्यातील सामान्यांना नेहमीच उपलब्ध असतात.
साहेबांचा साधारणपणे साडेतीन वर्षाचा मुलगा आहे. ‘माझा वेंगुर्ला’ने दोन महिन्यापूव वेंगुर्ल्यात पतंग महोत्सव आयोजित केलेला होता. त्या कार्यक्रमासाठी साहेब सहकुटुंब आले होते. त्यांच्याबरोबर अवघ्या साडेतीन वर्षाचा मुलगा होता. त्याला मी हाय हॅलो केले.. त्यावर साहेब त्याला म्हणाले, “नचिकेत, अंकल को नमस्ते बोल”, नचिकेतने मला नमस्कार केला नाही पण जोरात “जयहिंद“ म्हणून कडक सॅल्यूट ठोकला.. वातावरण व संस्कारांचा परिणाम मला अनुभवता आला. मला वाटते साहेबांनी आपल्या मुलाचे नाव नचिकेत हे विचारपूर्वक ठेवलेले आहे, नचिकेत म्हणजे आकाशाला गवसणी घालणारा..
उद्योजकांना आणि त्यांच्या उद्योगांना सुरक्षा मिळाली पाहिजे म्हणून आमच्या कुडाळ येथील औद्योगिक वसाहतीत स्वतः उपस्थित राहून सुमारे दोन तास उद्योजकांशी संवाद साधला.. साहेब निघून गेल्यावर आमच्या असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर मला म्हणाले, “पार्सेकरानो, आमच्या एम.आय.डी.सीत स्वतः अधीक्षक साहेब येवंन चौकशी करतत ही माझ्या कार्किदितली पयली घटना आसा.“ उद्योजकांनी काही सूचना केल्या. साहेब म्हणाले की अगदी उद्यापासून तुम्हांला बदल झालेला दिसेल… आणि आश्चर्य म्हणजे अगदी दुसऱ्या दिवसापासून कुडाळ औद्योगिक वसाहतीत पोलिसांचे रात्रीचे पेट्रोलींग सुरू झाले. त्यामुळे काही अनुचित प्रकारांना काही प्रमाणात आळा बसला.
काल समाजमाध्यमांतून साहेबांची पुण्याला बदली झाल्याचे समजले आणि त्यांना मी मेसेज दिला की “साहेब, तुम्हांला गुड बाय म्हणण्यासाठी व निरोप देण्यासाठी यायचे आहे..” साहेबांनी तात्काळ रिप्लाय दिले, नमस्ते, पाच वाजता या… त्याप्रमाणे मी माझे सहकारी श्री. मोहन होडावडेकर, प्रा. रूपेश पाटील आणि साहेबांनाच भेटायला आलेले आणि योगायोगाने तेथे उपस्थित असलेले आमचे वकील मित्र विक्रम भांगले मिळून साहेबांना शुभेच्छा दिल्या. दहा मिनिटे चर्चा झाली.
गेली अडीच वर्षे या जिल्ह्यातील सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आदरणीय अग्रवाल साहेबांचे मनापासून आभार.. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! – ॲड. नकुल पार्सेकर, 7798713475