साहित्य कट्टयाच्या मासिक कार्यक्रमांचे नियोजन

आजागांव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक विनय सौदागर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये मांद्रे (गोवा) येथील १९९० सालापासून अखंडित मासिक साहित्यिक कार्यक्रम आयोजित करणा­या ‘साहित्य संगम‘ची प्रेरणा घेऊन स्थापन केलेल्या साहित्य प्रेरणा कट्टयाचे आजगांव-शिरोडा पंचक्रोशीत सातत्याने मासिक साहित्यिक कार्यक्रम होत असतात. यंदा प्रथमच वर्षभराच्या मासिक कार्यक्रमांचे आगाऊ नियोजन करण्यात आले. यावेळी प्रा.गजानन मांद्रेकर, विनय सौदागर, सचिन गावडे, सचिन दळवी, सरोज रेडकर, एकनाथ शेटकर, विनायक उमर्ये, दिलीप पांढरे, स्नेहा नारिगणेकर व जयदीप देशपांडे उपस्थित होते.

    यंदाच्या मासिक कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी जन्मशताब्दी सांगता सोहळा, प्रेरणा साहित्य संमेलन, मालवणी साहित्य संमेलन, सुप्रसिद्ध ललित लेखक कै.रवींद्र पिगे यांच्या जन्मशताब्दी प्रित्यर्थ ‘शब्दांचा जादूगार – कै.रविद्र पिगे‘ हे साहित्यिक प्राचार्य गजानन मांद्रेकर (गोवा) यांचे व्याख्यान, ‘साहित्य संगम‘ (गोवा)च्या सदस्यांसमवेत मालवण येथे साहित्यिक सहली अंतर्गत स्थानिक साहित्यिकांशाी वार्तालाप तथा ग्रंथालयास भेट, लेखिका सोनाली परब (गोवा) यांचे कथावाचन, कोजागिरी काव्यसंमेलन, ‘संतांचे गूढ अर्थाचे अभंग‘ हा ह.भ.प.विष्णूबुवा शेटगांवकर (गोवा) यांचा गायन तथा निरूपणाचा कार्यक्रम आदींचा समावेश आहे.

    येत्या ऑगस्ट महिन्यात कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीची सांगता होते. तर ललित लेखक कै. रवींद्र पिगे यांची जन्मशताब्दी गेल्या मार्चमध्ये सुरू झाली आहे. हे औचित्य साधून ‘जन्मशताब्दी ः एक सरायला आली… तर दुसरी सुरू झाली…‘ हा कार्यक्रम मांद्रे – गोवा येथील ‘साहित्य संगम‘च्या संयुक्त विद्यमाने २९ जून रोजी पालये (गोवा) येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ‘जयवंत दळवी समजून घेताना‘ यावर पुरूषोत्तम तथा सचिन दळवी व विनय सौदागर बोलणार आहेत. तर ‘सुप्रसिद्ध साहित्यिक कै.रवींद्र पिगे यांचे ललित लेखन‘ यावर गजानन मांद्रेकर बोलणार आहेत.

     या व्यतिरिक्त दोन ‘पुस्तकचर्चा‘ कार्यक्रमांत सरोज रेडकर, नीलम कांबळे, सोमा गावडे, स्नेहा नारिगणेकर, शेखर पणशीकर, प्राची पालयेकर, वैभवी राय-शिरोडकर व डॉ.गणेश मर्ढेकर हे आपापल्या आवडीच्या पुस्तकांवर विवेचन करतील.

 

Leave a Reply

Close Menu