पावसाला सुरूवात झाली की, चाहूल लागते ती वटपौर्णिमा या सणाची. आपल्या पतीला निरोगी आयुष्य मिळावे म्हणून वटवृक्षाची पूजा करण्यासाठी सुहासिनी महिला उत्सुक असतात. यावर्षी हा सण मंगळवारी म्हणजेच १० जून रोजी संपन्न होत आहे. या सणासाठी लागणोर काळे मणी, अंशीचे दोन, बांगड्या आदी साहित्य गेले काही दिवस बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. दरम्यान, सोमवारी या साहित्यासोबत आंबे, फणस, अननस, पेरू, फुले तसेच वड्याच्या फांद्या मोठ्याप्रमाणावर विक्रीसाठी बाजारातपेठेत आल्या होत्या. नागरिकांनी बाजारात हजेरी लावत या साहित्यांची खरेदी केली. कामधंद्यानिमित्त व्यस्त असणा-या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सोमवारी रात्रौपर्यंत हा बाजार सुरू होता. मंगळवारी सकाळी सुद्धा या साहित्याची विक्री होणार आहे.