देशभरात महापुरूषांचे पुतळे उभारण्याची चढाओढ काही नवीन राहिलेली नाही. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे स्मारक उभे करून त्याला अभिवादन करणे ही चांगली गोष्ट असली, तरी त्यामागे असलेली निष्ठा, सचोटी आणि पारदर्शकता ही अधिक महत्त्वाची असते. दुर्दैवाने, पुतळे उभे राहतात पण मूल्यं कोसळतात, याचेच एक गंभीर उदाहरण नुकतेच राजकोटमधून समोर आले आहे.
मालवणमधील राजकोट परिसरातील शिवाजी महाराजांचा नवा पुतळा काही काळापूर्वीच उभा करण्यात आला होता. हा पुतळा विक्रमी वेळेत उभारण्यात आला, त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. विशेष म्हणजे याच जागेवरील नौदल प्रात्यक्षिकांच्यावेळी उभारण्यात आलेल्या पहिल्या पुतळ्याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु, वर्षभराच्या आतच हा पुतळा पडल्याने आरोप-प्रत्यारोप होऊन संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हा नवा पुतळा उभारण्याची तत्परता सरकारने दाखवली. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, या नव्या पुतळ्याच्या चौथयाच्या पायथ्याकडील भाग खचला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणी डागडुजी केली असल्याचे जाहीर केलं आहे, पण इतक्या लवकर या कामाची अवस्था अशी का झाली?
ही घटना केवळ एक तांत्रिक अडचण नसून, एक व्यापक व्यवस्थात्मक ढिलाईचं लक्षण आहे. कोट्यावधी रूपये खर्चून उभारलेल्या स्मारकाच्या कामातील त्रुटी काही महिन्यांतच उघड होतात. याचा अर्थ केवळ निकृष्ट दर्जाचं काम नाही, तर मूल्यांची, जबाबदारी आणि भावनांची अवहेलना आहे. बांधकामासाठी जबाबदार धरता येईल अशा व्यक्तींना कितीही बोगस स्वरूपाचं काम झालं तरी आपलं कोणी काहीही वाकड करू शकत नाही असा ठाम विश्वास निर्माण झाला आहे. यामध्ये नागरिकांचा पैसा, भावनिक गुंतवणूक व ऐतिहासिक संवेदनशीलता या तिन्हींचा अपमान होत आहे.
हीच कथा मालवण किनायावर उभ्या राहणाया शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला निधी मंजूर होतो, पण प्रत्यक्षात काम संथ गतीने सरकतं. केव्हा तरी एखादा फोटो झळकतो, बातम्या येतात आणि पुन्हा कामाची गाडी संथ गतीने चालू राहते. बयाच कामांच्या बाबतीत अधुरं काम, पडझड आणि सार्वजनिक पैशांचा अपव्यय ही दृश्यं आता इतकी सामान्य झाली आहेत की लोकांनी ती अंगवळणी घेतली आहेत.
इतिहासातील गौरवशाली व्यक्तींचा पुतळा म्हणजे केवळ लोखंड, संगमरवर किवा काँक्रीट नव्हे. तो आपल्या इतिहासाचं, श्रद्धेचं आणि नेतृत्वाचं प्रतीक असतो. शिवाजी महाराजांसारख्या इतिहास पुरूषाचा पुतळा उभा करताना त्यांचं कर्तृत्व आणि मूल्यव्यवस्था यांची जाणीव असली पाहिजे. पण आज ही स्मारकं केवळ ‘प्रकल्प‘ म्हणून पाहिली जातात जे कधी ‘इव्हेंट मॅनेजमेंट‘चा भाग बनतात, तर कधी राजकीय श्रेय घेण्याचं साधन. माध्यमंही अशा बातम्यांवर थोडा काळ लक्ष केंद्रीत करतात. मालवण – राजकोटसारख्या प्रकरणात एखादा फोटो, संतप्त प्रतिक्रिया आणि दुसयाच दिवशी दुसरं ‘हायप्रोफाईल‘ प्रकरण अशी बातम्यांची साखळी सुरू राहते. पण गंभीर प्रश्न, व्यवस्थेला अगर सरकारला जबाबदार ठरविणारे प्रश्न विचारले जात नाहीत. संबंधित यंत्रणेकडून लेखी जबाबदारी मागवली जात नाही. सोशल मीडियावर सामान्य नागरिक जर असे सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित करू लागला तर त्याला गांभीर्याने न घेता सोशल मीडियावरील काही लोकांकडून देशद्रोही ठरविण्यात येते. अशा काही घटना घडल्या तर सामान्य नागरिक एखादा दिवस संतप्त होतात, सोशल मीडियावर व्यक्त होतात आणि दुसया दिवशी विसरून जातात. हे विस्मरणच भ्रष्ट आणि निकृष्ट कामाला खतपाणी घालणारं ठरतं.
शिवाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या विचारांनी समाजमन घडवायला हवं. त्यांनी स्वराज्य उभं करताना जी स्पष्टता, न्यायप्रियता आणि मूल्यनिष्ठा ठेवली, ती आपण विसरतोय का? त्यांचा पुतळा पडल्यानंतर केवळ तो परत उभा करणं हा उपाय होऊ शकत नाही. तो पुन्हा पडणार नाही यासाठी व्यवस्था उभी करणं, हे खया अर्थाने त्यांच्याशी निष्ठा ठेवणं ठरेल. शिवरायांनी रयतेला नेहमी केंद्रस्थानी ठेवलं. प्रगत तंत्रज्ञान नसताना शिवरायांनी बांधलेले किल्ले आजही गतवैभवाची साक्ष देत आहेत. अशावेळी अत्याधुनिक सुविधा हाताशी असताना अशा घटना वारंवार होणं म्हणजे आपल्या मूल्यांची अधोगती दर्शवत आहे. आज आपल्याला गरज आहे ती केवळ स्मारकांची नाही, तर कामाप्रती प्रामाणिक आणि समर्पित भाव जपण्याची. अशा प्रकल्पांसाठी स्वतंत्र देखरेख समित्या असाव्यात, निधीच्या वापराचा पूर्ण तपशील पारदर्शकपणे प्रसिद्ध केला जावा आणि यंत्रणांवर जनतेचा अंकुश रहावा. त्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करून प्रश्न विचारणं, स्थानिक लोकप्रतिनिधींना जबाबदारीची जाणीव करून देणं आणि माध्यमांनी अशा गंभीर घटना केवळ इव्हेंटम्हणून ‘कव्हर‘ न करता त्याचा सतत ‘पाठपुरावा‘ करणं आवश्यक आहे.
सामान्य नागरिकांनी देखील हे सरकारचं काम म्हणून बाजूला बसणं थांबवलं पाहिजे. आपली सामाजिक संपत्ती आणि श्रद्धेची प्रतीकं जपणं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे. आपण सार्वजनिक प्रश्नांवर बोलतो, संतापतो, पण सातत्याने लक्ष ठेवून विचारत नाही. ते बदलणं अत्यावश्यक आहे.
पुतळे उभे करणे हे स्मरण ठेवण्याचं साधन असलं, तरी त्या स्मरणातून कृती घडवणं हेच खया अर्थाने राष्ट्रभक्तीचं प्रतीक ठरावं. आपण इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचं स्मरण करत असताना त्यांच्या मूल्यांचा आदर करतो का, याचा विचार करावा लागेल. कारण पुतळा उभारणं हे एकदाचं काम असलं, तरी कर्तृत्वाने एखादं काम उभं करणं करणं ही सततची प्रक्रिया आहे आणि ती आपण सगळ्यांनीच सुरू ठेवली पाहिजे.