नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे सन २००४ पासून कै.श्रीराम मंत्री यांच्या कायम निधीतून सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत व्यासंगी वाचक पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी संस्थेचे वर्गणीदार सभासद प्रसाद विश्वनाथ खडपकर हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक असे पुरस्काराचे स्वरूप असून २२ जून रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.शरयू आसोलकर यांच्या हस्ते श्री.खडपकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे. प्रसाद खडपकर हे कुडाळ येथील प्रसिद्ध नाट्यकर्मी केदार देसाई यांच्या साई कलामंच या संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सादर केलेल्या ‘बत्ताशी १९४७‘ व ‘अयोध्या‘ या नाटकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या आहेत.