जिल्हा परिषद कृषी विभाग व तालुका कृषी विभागातर्फे अधिकृत विक्री केंद्रावर वारंवार तपासण्या होतात. मात्र, तरीही काही कंपन्या थेट गावागावांमध्ये पोहोचून विविध आमिषे दाखवून बोगस खते, बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. यापासून सावध राहण्यासाठी शेतकऱ्यांनीच सतर्क होण्याची गरज आहे, असा सल्ला शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
वेंगुर्ले तालुका पत्रकार संघ व प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या बागायतदार, शास्त्रज्ञ मंचातर्फे आयोजित ‘शेतकरी राजा जागा हो’ या खास चर्चासत्रात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व त्यापासून बाळगायची सावधानता यावर विस्तृत चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू बागायतदार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. महेंद्र गवाणकर, तालुका कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सागर मोरे, डॉ. भिवराव ठवरे, डॉ. वैशाली झोटे, पंचायत सिमितीचे कृषी विस्तार अधिकारी एस. एस. सावंत, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र सहाय्यक राजू गव्हाणे, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष योगेश तांडेल, सचिव विनायक वारंग, सदस्य दाजी नाईक, प्रथमेश गुरव, भरत सातोसकर, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य महेंद्र मातोंडकर, लता गुड्स ट्रान्सपोर्टचे मालक तथा आंबा बागायतदार जगन्नाथ सावंत, नर्सरी चालक शिवराम आरोलकर आदी उपस्थित होते.
आपल्याकडे पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. पारंपरिक व आधुनिक पद्धतीने ही शेती केली जाते. पहिल्या पावसानंतर भात पेरणी केली जाते. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खतांची आवश्यकता असते. जून महिन्यापासूनच आंबा व काजू बागायतीमधील मशागतीची कामे सुरू होतात. झाडांना खतांची मात्रा याचवेळी देण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर खतांची विक्री होत असते. परवानाधारक केंद्रातून किंवा सोसायट्यांमार्फत उपलब्ध असणारी खते आवश्यक त्या सर्व तपासण्या पूर्ण करूनच विक्रीसाठी आलेली असतात. त्यामुळे तेथील खरेदी केव्हाही सुरक्षीतच असते.
अलिकडच्या काळात काही कंपन्यांचे एजंट गावागावत फिरून सवलतीच्या दरात घरपोच खते, बियाणे देण्याचे आमिष शेतकऱ्यांना दाखवत आहेत. अशा लोकांमुळे यापूव शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकदा फसवणूक झालेला शेतकरी अशा लोकांपासून सावध झाला आहे. अन्य शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. खते व बियाणांची किंमत जास्त असल्याने फसवणूक झाल्यास अशा शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होऊ शकते. त्यामुळे बोगस खते व बियाणांपासून सावधानता बाळगणे कधीही शेतकऱ्यांच्या हिताचेच ठरणार आहे.
सरकारतर्फे वितरित होणारी रासायनिक व सेंद्रीय खते व्हेरिफाईडच असतात. विविध प्रकारच्या तपासण्या पूर्ण करून ती विक्रीसाठी उपलब्ध होतात. सेंद्रीय खतांच्या नावाखाली जास्तवेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी करताना पक्की पावती घेणे आवश्यक आहे. याशिवाय खरेदी केलेल्या खत किंवा बियाणांचे सॅम्पल वेस्टनासह हंगाम संपेपर्यंत ठेवणे गरजेचे आहे. आपली फसवणूक झाली असा संशय वाटल्यास शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयामार्फत तशी तक्रार सादर करता येते. अशी चर्चा यावेळी झाली.