समुद्रातील पर्यावरणीय बदलाविषयीची माहिती जाणकार देतात. परंतु समुद्राच्या सानिध्यात बालपण गेल्यामुळे हवामानाचा समुद्रावर होणारा परिणाम मी जवळून पाहिलेला आहे. उत्तरेचा वारा मासेमारीसाठी चांगला असतो. त्यामुळे तळाला असलेले मासे समुद्राच्या पुष्ठभागावर येतात आणि मासे मारणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. म्हणून मासेमारीसाठी हा अनुकूल वारा असतो. तसेच हा उत्तरेचा वारा किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यासाठी पण चांगला असतो. खाऱ्या हवेमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. तर दक्षिणेचा वारा वादळी वातावरण तयार करतो. वादळाची चाहूल लागल्यामुळे मासा सागराच्या तळाला जाऊन बसतो. त्यामुळे मासेमारी या दिवसात फार कमी होते. मतलई वारे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहत असतात. त्यामुळे किनाऱ्याजवळ समुद्र तलावासारखा शांत दिसतो. परंतु समुद्राच्या आतमध्ये म्हणजे साधारणपणे 10 वाव (40 ते 45 फूट) खोल पाण्यात समुद्र अशांत असतो. जमिनीकडून वाहणारे वारे आणि समुद्रातील वाहणारे वारे एकमेकांना भिडल्यामुळे समुद्राच्या आत लाटा निर्माण होतात आणि त्या किनाऱ्यावरूनही दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे मतलई वारे सुरु होत असताना मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या लोकांना समुद्राच्या पोटातून आवाज ऐकू येतात आणि ते अशांत समुद्राचे संकेत देत असतात. त्यावेळी मासेमारी करणारे किनारा लवकर गाठण्याचा प्रयत्न करत असतात.
समुद्राच्या लाटांचे सुंदर रूप मनाला आनंद देणारे आहे. ते मी अजूनही गावात गेल्यानंतर अनुभवतो. मूठवाडी वेंगुर्ला या माझ्या गावातील समुद्राला लागून डोंगराचा कडा आहे. समुद्र किनाऱ्याला डोंगराचा आडोसा मिळाल्यामुळे किनाऱ्यावर छोट्या छोट्या लाटा नाजूक पावलांनी आवाज न करता किनाऱ्यावर पसरतात. हे पाहून मन प्रसन्न होते. तर पावसाळ्यानंतर श्रावण महिन्याच्या दरम्यान समुद्राच्या किनाऱ्यालगत आतून खोलगट भाग तयार होतात. कारण तिथली वाळू तुफानात वाहून गेलेली असते. त्यामुळे येणारी लाट किनाऱ्यावर आदळते, परंतु किनाऱ्यालगत असलेल्या खोलगट भागामुळे ती पसरत नाही आणि परत समुद्रात जाते. अशावेळी समुद्रातून येणाऱ्या लाटेला ती कडकडून आलिंगन देते त्या मिलनाने सर्वत्र पाण्याचे तुषार फेकले जातात. हे विलोभनीय दृश्य वारंवार पाहावेसे वाटते.
समुद्राच्या पाण्यात माश्यांचे थवे फिरत असतात. त्या माश्यांच्या थव्यामुळे समुद्राच्या पुष्ठभागावर पाण्यामध्ये होणाऱ्या हालचालींवरून तो कोणत्या प्रकारचा मासा आहे हे आम्ही लहानपणी किनाऱ्यावरून सांगत असू. बांगडा, तारली, पेडवे, तोळी अशा प्रकारचे मासे थव्याने फिरत असत. त्यांना पकडण्यासाठी त्याप्रकारची जाळी टाकली जायची. आता पर्शियन जाळ्याचा वापर अधिक प्रमाणात होत असल्यामुळे असे माश्यांचे थवे किनाऱ्याजवळ यायचे कमी झाले आहे. तरीपण काही वेळा पेडवे, तारली सारखे जिवंत मासे अजूनही लाटांबरोबर किनाऱ्यावर येऊन पडतात हे मी स्वतः पाहिलेले आहे. थंडीच्या दिवसात किनाऱ्यालगत उबदार पाणी असल्यामुळे कदाचित ते जवळ येत असतील.
या भागातील समुद्रतळी विलक्षण जलचर सृष्टी अस्तित्वात आहे. कोरल म्हणजे प्रवाळ आणि विविध जातीचे, आकाराचे आणि रंगांचे मासे या समुद्राच्या तळाशी आहेत. त्यातील काही मी स्वतः मालवणच्या किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग करताना पाहिलेले आहे. समुद्राच्या पाण्यात वेगवेगळ्या दिशेने प्रवाह पण वाहत असतात. आणि त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मासे प्रवास करत असतात. मासेमारी करणारे त्याप्रमाणे आपल्या जाळ्याची स्थिती ठेवत असतात.
चांदण्या रात्री कासवे अंडी घालण्यासाठी आमच्या किनाऱ्यावर येतात. ते पाहण्यासाठी आम्ही काही मित्रमंडळी लहानपणी किनाऱ्यावर फिरत असायचो. ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी अशा जातीची कासवे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. वाळूमध्ये खड्डा खणून त्यात अंडी घालतात. त्यातील काही अंडी कोल्हे-कुत्रे त्यावेळी खात असत. परंतु वाचलेल्या अंड्यातून अंदाजे 2 महिन्यांनी त्या खड्यातून छोटी छोटी कासवाची पिल्ले बाहेर येत आणि समुद्राच्या पाण्यात जात असत. हे कुतूहल, चमत्कार आम्ही लहानपणी पाहत असू. आता गावांगावातून कासव संवर्धनासाठी जागरूकता निर्माण झाली आहे. वनखात्यामार्फत आणि काही निसर्गप्रेमी मंडळींमार्फत स्थानिकांना कासवाची अंडी वाचविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अंड्याचे संरक्षण करून पिल्ले समुद्रात सोडण्याची मोहीम पार पाडली जाते. माझ्या गावातील तरुण मुले हे काम उत्साहाने करताना दिसतात.
ज्या ज्या वेळी मी माझ्या गावी जातो त्या त्या वेळी अधिक वेळ मी माझ्या समुद्र किनाऱ्यावर फिरत असतो आणि अथांग निळा निळा समुद्र न्याहाळत असतो. मन विशाल करत असतो. समुद्रात मनसोक्त पोहत असतो. ज्या वाळूत मी लहानाचा मोठा झालो त्या वाळूत रमतो आणि पुन्हा लहान होतो. निसर्गाच्या जवळ गेल्यामुळे मनाला उभारी येते, आनंद वाटतो आणि ते अनुभवण्यासाठी मी वारंवार माझ्या गावी जातो. परदेशी पर्यटक गोव्याच्या समुद्रकिनारी 2-3 महिने राहतात आणि आरोग्याला पोषक अशी ऊर्जा घेऊन जातात. त्या दृष्टीने आपण भाग्यवान आहोत. अशा या निसर्गसंपन्न परिसरात देवाने मला जन्म दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
– बापू गिरप, 9920955175