शैक्षणिक प्रगतीसाठी मोबाईलचा वापर करा – डॉ. शरयू आसोलकर

 मोबाईल ही सध्याची गरज असली तरी त्याचा उपयोग शैक्षणिक प्रगतीसाठी करून संस्कारक्षम बना. बाल साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याचे वाचन विद्यार्थ्यांनी करा. वाचनाने माणूस आणि समाज वाचता येतो. यासाठी प्रत्येकाने दररोज वाचन करा, असा सल्ला कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.शरयू आसोलकर यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार व पारितोषिक वितरणप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.

      नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे विविध देणगीदारांनी दिलेल्या देणगीतून प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्ष, उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ तसेच स्व. सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्कार वितरण असा एकत्रित कार्यक्रम २२ जून रोजी संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर डॉ.शरयू आसोलकर, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, सदस्य महेश बोवलेकर उपस्थित होते. भाषा ही आपली अर्जित संपत्ती आहे. ती स्वतः कमविली पाहिजे; टिकविली पाहिजे. भाषेची श्रीमंती विद्यार्थ्यांना कळावी आणि पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांतून मंगेश पाडगांवकर, वि.दा.करंदीकर यांसारखे साहित्यिक निर्माण होतील अशी अपेक्षा डॉ.शरयू आसोलकर यांनी व्यक्त केली.

      संस्थेतर्फे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम आलेल्या, सिधुदुर्ग जिल्ह्यातून विद्यार्थी व विद्यार्थीनींमधून प्रथम येणा-या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तर वेंगुर्ला येथील रहिवासी व दोडामार्गचे कृषी अधिकारी प्रसाद विश्वनाथ खडपकर यांना सुदत्त कल्याण निधी संस्थेने दिलेल्या देणगीतून जाहीर झालेला स्व. सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्कार डॉ.शरयू आसोलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना त्यांच्या वैविध्यपूर्ण वाचनाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला होता. मी माझ्या बालपणापासूनच वाचनालयातील पुस्तके, मासिक वाचत आहे. वाचनाच्या छंदामुळेच आज मी प्रगतीपथावर पोहचलो असल्याचे पुरस्काराला उत्तर देताना श्री.खडपकर म्हणाले.

      समाजातील उत्तम गुणांचा गुणगौरव व्हावा ही या संस्थेची मूळ भूमिका आहे. त्यांना समाजापुढे आणण्यासाठी आमचा प्रयत्न असतो असे अनिल सौदागर यांनी सांगितले. तर कैवल्य पवार यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वर्षभर चालणा-या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

      यावेळी संस्थेचे उपकार्यवाह माया परब, सदस्य दीपराज बिजितकर तसेच सुनिल मराठे, नितीन कुलकर्णी, श्रीनिवास सौदागर, तुषार कामत, ज्ञानेश्वर हरमलकर, चंद्रकांत सावंत, जॉन्सन डिसोजा, यशोगंधा मोर्जे, नरेंद्र वराडकर, विनय सामंत, विशाखा वेंगुर्लेकर, सोनाली खडपकर, प्रितम ओगले यांच्यासह पालक, विद्यार्थी, वाचक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      पाहूण्यांचे स्वागत व परिचय महेश बोवलेकर यांनी केला. तर आभार कैवल्य पवार यांनी मानले. शिरसाट मिठाईचे मालक बाळा शिरसाट यांनी उपस्थितांना अल्पोपहाराची सोय केली.

Leave a Reply

Close Menu