पावसाळा सुरू झाला, की माणसाची पहिली गरज असते ती छत्री. पाऊस अनेक आविष्कारांचा निर्माता आहे. तर, रंग माणसाच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे अद्भुत रसायन आहे. पाऊस, रंग आणि छत्री यांचा संगम घडवत ‘माझा वेंगुर्ला’ या संस्थेने आयोजित केलेल्या उपक्रमात अबालवृद्धांनी उत्साहाने सहभागी होत पांढऱ्याशुभ्र छत्र्यांवर विविध रंगांची उधळण करत सर्जनशील कलाकृती साकारल्या.
वेेंगुर्ला येथील स्वामिनी मंगल कार्यालयात ‘रंगधारा’ आणि ‘माझा वेंगुर्ला’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉप’ या उपक्रमात सर्वच वयोगटातील सुमारे 80 हून अधिक उमद्या कलाकारांनी सहभाग घेतला. या आगळ्या-वेगळ्या आणि सर्जनशील उपक्रमात वेंगुर्ल्यातील सर्वच वयोगटातील नागरिक, विद्याथ आणि कलाप्रेमींनी अगदी समरसून मुक्तहस्ते रंगांची उधळण करत या नाविन्यपूर्ण उपक्रमातून असंख्य देखण्या कलाकृतीनी जन्म घेतला.
अम्ब्रेला पेंटिंगच्या माध्यमातून वेंगुर्ल्याचा समुद्र किनारा, येथील संस्कृती, निसर्गसंपन्न वातावरण, येथील धार्मिकता, आभाळातील मनमोहक इंद्रधनुष्य, वारली चित्रशैली, विविध कलाकुसर, पाने, फुले, फळे यांचे लोभस रंग, कल्पना आणि वास्तवतेतील अनोखे आविष्कार, समाजप्रबोधन, पावसाळी कवितांच्या रंजक ओळी, शब्दलिपीचे फटकारे, कॅलीग्राफीच्या नाना तऱ्हा आणि रंग आणि रेषांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. विविध वयोगटांतील सहभागींच्या कल्पकतेतून छत्र्यांवर पर्यावरण, समुद्रकिनारा, मत्स्यव्यवसाय, लोकसंस्कृती, स्वच्छता आणि सामाजिक ऐक्य यासारख्या विषयांवरही सुंदर चित्रे साकारण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन जे. जे. आर्ट कॉलेज, मुंबईचे निवृत प्राध्यापक तथा वेंगुर्ल्याचे स्वच्छता ॲम्बेसिडर सुनील नांदोसकर व माझा वेंगुर्लाचे अध्यक्ष जनार्दन शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी माझा वेंगुर्ला संस्थेचे पदाधिकारी मोहन होडावडेकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, ॲड. शशांक मराठे, कार्यशाळेचे समन्वयक यासिर मकानदार, संदीप परब, खेमराज कुबल, अमृत काणेकर, श्रुती गायचोर, अमोल खानोलकर, नीलेश चेंदवणकर, मुक्तांगण परिवाराच्या प्रमुख मंगलताई परूळेकर, समर्पण फाऊंडेशनचे सचिव महेंद्र मातोंडकर, वेताळ प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा सर्पमित्र महेश राऊळ, माजी नगरसेवक महेश वेंगुर्लेकर, श्रीनिवास सौदागर, शेखर मयेकर, भानू मांजरेकर, आनंद बटा, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई आदी उपस्थित होते. माझा वेंगुर्ला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय सुयोग्य नियोजन करून प्रत्येक सहभागीला साहित्य, मार्गदर्शन आणि प्रेरणा पुरवली. या उपक्रमामध्ये सृजनशीलता, सामाजिक जाणीव आणि लोकसहभाग यांचा संगम अनुभवता आला. रंगीबेरंगी छत्र्यांनी परिसर अक्षरशः उजळून निघाला होता. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढीलवष अधिक मोठ्या प्रमाणात आयोजन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.
रंगधाराचे मुख्य शिलेदार बॅचलर ऑफ फाईन आर्ट इन अप्लाईड आर्टस्चे पदवीधर मयुर पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमास नीलेश चव्हाण, प्रथमेश महाडिक, लखन पाटील, राहुल सावंत, हितेश परब व जयदेश परब यांनी समर्थ साथ दिली. या सर्व युवा चित्रकारांनी छत्रीवर रंगांचा अविष्कार कसा करायचा, याचे प्रशिक्षण उपस्थितांना दिले. सहभागी सर्वच उमद्या कलाकारांच्या सर्जनशीलतेला चालना देत नव्या आविष्कारांची निर्मिती केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शशांक मराठे यांनी केले. तर माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी आभार मानले.