सणांचं निसर्गाशी नातं जपताना

जून-जुलैचे महिने म्हणजे निसर्गाचा पुनर्जन्म. आकाशात ढगांची गर्दी, मृदगंधाने भरलेली हवा आणि  सृष्टीत आलेली एक वेगळीच उर्जा. या ऋतूच्या सुरूवातीला आपली पारंपरिक संस्कृती विविध सणांनी नटलेली असते.

   वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, नागपंचमी, श्रावणातील सोमवार, हरितालिका आणि असेच अनेक सण याच काळात साजरे होतात. हे सण केवळ धार्मिक परंपरेपुरते मर्यादित नाहीत, तर त्यामध्ये निसर्गाशी असलेलं एक अत्यंत सखोल नातं आहे. आज जरी हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे होत असले, तरी त्यांच्या मूळ उद्देशाचा, त्यांच्या निसर्गाशी असलेल्या नात्याचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

        वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाभोवती सात फे­या मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हे दृश्य आजही अनेक ठिकाणी भावपूर्णपणे पाहायला मिळतं. पण आपण एक गोष्ट विसरतो की, वडाचं झाड ही एक जैववैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची जीवंत संपत्ती आहे. वडाचे झाड भरपूर प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतं, हवामान नियंत्रणात मदत करतं आणि अनेक प्रकारच्या पक्ष्यांचं व  कीटकांचं आश्रयस्थान ठरतं. या झाडाच्या पूजनामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून त्याच्या संवर्धनाचा संदेशही आहे. ही भावना आपण विसरतोय का?

        नागपंचमी हा सण सर्पदेवतेच्या पूजनाचा दिवस म्हणून साजरा होतो. पण या सणामागेही एक महत्त्वाची निसर्गविषयक संकल्पना आहे. साप म्हणजे नुसताच भीतीदायक प्राणी नव्हे. तो शेतीसाठी उपयुक्त आहे कारण तो उंदरांसारख्या पिकांचे नुकसान करणा-­या प्राण्यांचा नैसर्गिक नियंत्रक आहे. त्यामुळे त्याचं अस्तित्व टिकणं हे शेतक­यांच्या दृष्टिकोनातूनही आवश्यक आहे. पूर्वी नागपंचमीला प्रत्यक्ष साप न पकडता, त्याच्या प्रतिकात्मक पूजेला महत्त्व दिलं जायचं. आजच्या काळात मात्र या प्रथेत अंधश्रद्धा आणि व्यावसायिकरण डोकावतंय, ज्यामुळे सापांचे शोषण होतं. ही सणाची विकृती निसर्गासाठी धोकादायक ठरते.

    आषाढी एकादशीचा सण हा पंढरपूरच्या वारीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आध्यात्मिक आणि सामाजिक चेतना जागवतो. लाखो वारकरी पावसात भिजत, भजन करत, संतांचा संदेश घेऊन पंढरपूरात दाखल होतात. ही वारी केवळ भक्तीचा प्रवास नाही, तर सामाजिक एकतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा एक सुंदर नमुना आहे. पावसाळ्यात पायी चालत जाणं, संपूर्ण वारक­यांचं एकत्र चालणं हे सर्व नैसर्गिकतेशी जोडलेलं आहे. आज या वारीला शिस्त आणि शाश्वततेची जोड दिली, तर ती पर्यावरणपूरक आणि आध्यात्मिकतेचा आदर्श ठरू शकते.

        श्रावण महिन्यातले उपास, सोमवारचे व्रत, मंगळागौरी, हरितालिका हे सर्व सण निसर्गाच्या चक्राशी जुळलेले आहेत. पावसाळा हा ऋतू शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा मानला जातो. त्यामुळे उपास, अल्प आहार, विशिष्ट खाद्यपदार्थ याचा शारीरिक स्वच्छतेशी संबंध आहे. हे व्रत आरोग्यदायी जीवनशैलीचे संकेत देतात. पण आज त्यामागची शास्त्रीय बाजू दुर्लक्षित होते आणि फक्त परंपरा म्हणून ती पाळली जाते.

        सणांचं मूळ तत्त्व हे आनंद, एकत्रितपणा, आरोग्य आणि निसर्गाशी सुसंवाद असं होतं. पण आजचं वास्तव थोडं वेगळं आहे. बाजारपेठेचा वाढता हस्तक्षेप, कृत्रिम सजावट, प्लास्टिकचा वापर आणि सणांचं व्यावसायिकरण यामुळे या उत्सवांचा खरा अर्थ हरवत चालला आहे. उदा. मातीच्या मूळ प्रतीकांची जागा प्लास्टिकच्या किवा रसायनांनी तयार केलेल्या वस्तूंनी घेतली आहे. नैसर्गिक पूजाविधीऐवजी ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणहानी करणा­-या पद्धती प्रचलित झाल्या आहेत.

        या सर्व पार्श्वभूमीवर, सणांना नव्याने समजून घेणं आवश्यक ठरतं. सण म्हणजे निसर्गाच्या गाभ्याशी जोडलेली मानवी उत्सवशृंखला आहे. ती केवळ धार्मिकता नव्हे, तर पर्यावरणाची शाळा आहे. म्हणूनच प्रत्येक सण साजरा करताना त्यामागचा निसर्गाशी असलेला संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे. सणांचं धार्मिकतेशी नातं मान्य करताना, त्यांच्या सामाजिक व पर्यावरणीय अर्थाचं भान ठेवणं ही आजच्या काळातील खरी आस्थेची परीक्षा आहे.

       आपल्या देशातील काही भागांमध्ये अजूनही ही परंपरा डोळसपणे जपली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘देवराई‘ ही संकल्पना त्याचे उदाहरण आहे. गावाच्या एका विशिष्ट भागातील जंगलाला ‘देवाचं स्थान‘ मानून त्याचं रक्षण केलं जातं. या देवरायांमुळे अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि पाणी आजही टिकून आहेत. ही परंपरा केवळ धार्मिक नव्हे, तर शाश्वत जैवविविधतेचा एक आदर्श मॉडेल आहे. या विचारसरणीचा उपयोग आपण इतर सणांमध्ये का करू नये?

        सणांचा उद्देश म्हणजे दैनंदिन आयुष्यात एक वेगळा श्वास, आनंदाचा क्षण आणि सामाजिक एकत्रतेचा अनुभव देणं. हे सण नक्कीच हवेत. पण ते साजरे करताना निसर्गाशी समतोल साधणं, पर्यावरणावर प्रेम करणं, आणि आपण त्या सणांचा खरा अर्थ ओळखून तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही खरी काळाची गरज आहे. परंपरा अंधपणे पाळण्यापेक्षा, ती का अस्तित्वात आली, तिचा मूळ उद्देश काय होता आणि आज त्या संदर्भात आपण कोणत्या जबाबदा­या पार पाडू शकतो हे समजून घेतलंच पाहिजे.

      सण म्हणजे उत्सव, पण तो निसर्गाचा आणि माणसाचा एकत्र साजरा होणारा सोहळा असावा. श्रद्धा आणि शाश्वततेचं नातं जोडणारे हे सण केवळ धार्मिक रितीरिवाज नव्हे, तर पर्यावरणप्रेमाची सजीव साक्ष देणारे उत्सव आहेत. त्यांना नव्याने समजून घेणं आणि साजरं करणं, ही आपल्या संस्कृतीचं आणि पर्यावरणाचं जतन करण्याची खरी सुरूवात ठरेल.

Leave a Reply

Close Menu