खांद्यावर भगवी पताका, टाळ मृदुंगाचा गजर, मुखात पांडुरंगाचे नाव घेत विठ्ठल भक्तांनी वारकरी पेहरावात काढलेल्या वेंगुर्ला ते कालवी बंदर या आषाढी पायी वारीला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘पाहूं द्या रे मज विठोबाचे मुख लागलीसे भूक डोळां माझ्या‘ अशी अवस्था झालेल्या वारकऱ्यांना सुमारे 18 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर विठोबाचे सगुण साकार रुप डोळ्यासमोर दिसताच ‘आजी संसार सुफळ झाला गे माये देखियले पाय विठोबाचे! अशा भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.
आषाढी एकादशीदिवशी सकाळी शहरातील दाभोली नाक्यावरुन या पायी वारीला प्रारंभ झाला. मार्गामार्गात विठ्ठल नामाचा जयघोष करीत ही वारी दुपारी कालवी बंदर येथील मंदिरात पोहचली. यावेळी मंदिरातर्फे या पायीवारीचे स्वागत करण्यात आले. पांडुरंगाच्या कृपेने जेवढी वर्षे पायीवारी करणे शक्य आहे तेवढी वर्षे पायीवारी चालू ठेवण्याचा बाबू झांट्ये ह्यांच्या मित्रपरिवारांचा मानस आहे.
प्रतिवष वारकऱ्यांचा ओघ वाढताच
वै. श्रीकृष्ण ऊर्फ बाबू झांट्ये ह्यांच्या प्रेरणेने वेंगुर्ला ते कालवीबंदर विठ्ठल रखुमाई मंदिर अशी आषाढी पायी वारी गेली चार वर्षे सुरु आहे. सुरूवातीला काहीशा अल्प प्रतिसादात या वारीला प्रारंभ झाला होता. त्यानंतर प्रत्येकवष या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा ओघ वाढतच चालला आहे. या पायी वारीचे यंदाचे हे पाचवे वर्ष होते.
वारीचा आनंद लुटता आला
आषाढी एकादशीला सर्व सतांच्या पादुका पंढपुरात येत असल्याने या वारीला महत्त्व प्राप्त झाले आहे. अलिकडे गावागावातून या वारीला पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठलभक्तांची संख्या वाढत आहे. परंतु, नोकरीव्यवसायानिमित्त व्यस्त असलेल्या पण वारीची ओढ असलेल्यांना थेट पंढरपूर गाठता येत नाही. त्यामुळे वेंगुर्ला ते कालवीबंदर या वारीत सहभागी होऊन वारीचा आनंद लुटता येतो, अशा प्रतिक्रिया सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांकडून ऐकायला मिळाल्या.