सीमा मराठे सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्काराने सन्मानित

माध्यमस्वातंत्र्याची गळचेपी होण्याच्या आजच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा नैतिक अधिकार खरेच आहे का, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर टीका केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील विविध पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव, माजी खासदार रामशेठ ठाकूर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद बाभाळे, कार्याध्यक्ष मन्सूरभाई शेख, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके आदी मान्यवर उपस्थित होते.

      शरद पवार यांनी बोलताना त्यांच्या 57 वर्षांच्या सक्रिय राजकीय पत्रकारितेतील कारकिदतील अनेक स्थित्यंतरांबद्दलची निरीक्षणे नोंदवली. आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आणखी दोघांसोबत केलेला मासिक सुरू करण्याचा निष्फळ प्रयत्न अशा अनेक आठवणी सांगितल्या. आणीबाणीच्या कालखंडात काही वृत्तपत्रांनी सरकारविरोधातील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. अग्रलेखाची जागा मोकळी सोडत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला होता. यथावकाश इंदिरा गांधींनी त्या कालखंडाची, निर्णयाची जाहीर माफी मागितली. लोकांनी त्यांचा पराभव केला. पुढे जनता सरकारच्या काळानंतर पुन्हा लोकांनी इंदिरा गांधी यांना निवडून देत माफ केल्याचेही दाखवून दिले. पण आज 50 वर्षानंतर या गोष्टी उकरून काढल्या जात आहेत.

      यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये सिंधुदुर्गातील साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांना महिला पत्रकारांसाठी असलेला सावित्रीबाई फुले स्मृती पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना, इलेक्ट्रॉनिक मिडियासाठीचा शशिकांत सांडभोर पुरस्कार अभिजित करांडे यांना, प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार अमेय तिरोडकर यांना, भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार अंमळनेर येथील पत्रकार पांडुरंग पाटील यांना, नागोजीराव दुधगावकर पुरस्कार बीड येथील सुराज्य दैनिकाचे संपादक सर्वोत्तम गावस्कर यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार गोवा दैनिक हेरॉल्डचे संपादक दिनेश केळुसकर यांना, कृषी क्षेत्रातील माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार अँग्रोवनचे पत्रकार बाळासाहेब पाटील यांना, संतोष पवार स्मृती पुरस्कार पुणे येथील भरत निगडे यांना तर स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सच्या शर्मिला कलगुटकर यांना देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

      पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकार संरक्षण कायदा अधिनियमात रुपांतर होत नसल्याची खंतही बोलून दाखवली.

      मधुकर भावे यांनीही आपल्या 60 वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिदतील महत्त्वाचे टप्पे उलगडून सांगत, सध्या पत्रकारांनी सजग भूमिका घेत सतत व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. विरोधक आणि सत्ताधारी हे वैचारिक असण्याचा काळ यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांचा होता. आता काळ खूप कठीण आहे. हा काळ पत्रकारांनी कर्तव्याला जागण्याचा काळ आहे. या काळात एकच एक मुद्दा धरून ठेवताना मूलभूत प्रश्नांचा आरसा सातत्याने समाजासमोर ठेवला पाहिजे. पत्रकारिता हा निखारा आहे. त्याने पदर पेटताही नये आणि निखारा विझूही देता कामा नये याचे भान पत्रकारांनी ठेवले पाहिजे, असे सांगितले.

      डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले की, आरशाचे बहिर्गोल, अंतर्गोल आणि आहे तसे दाखवणारा आरसा असे प्रकार असतात. आहे त्यापेक्षा अवाजवी दाखवण्याकडे कल अलिकडे वाढलेला दिसतो. एआयच्या काळात मानवी मूल्य जपत नेमकेपणाने पत्रकारिता करणे, खरेच आव्हानात्मक असणार आहे.

      अभिनेता भरत जाधव यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. त्यांनीही आपले ‌‘खबरदार‌’ चित्रपटाच्यावेळी पत्रकारांची भूमिका साकारली तेव्हा त्या आठवणी सांगत, तेव्हा खऱ्या अर्थाने पत्रकार म्हणजे काय असतो, याची जाणीव झाल्याचे नमूद केले. महेश म्हात्रे यांनी सन्मानाथ पत्रकारांच्या वतीने प्रतिनिधीक मनोगत व्यक्त करताना एवढ्या कठीण काळात पत्रकारितेचा वारसा जपलेल्या सर्वांना आपल्या माणसाची मिळालेली थाप नक्कीच प्रेरणादायी असल्याचे सांगत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याचे पाठबळ मिळाल्याचे सांगितले.

      अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखेने आयोजन केलेल्या या पत्रकारिता पुरस्काराचे सूत्रसंचालन विशाल परदेशी, प्रस्तावना अभामपपचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी तर आभार सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu