आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी कै. फटीराव रामचंद्र देसाई अर्थात ‘फरा‘ प्रतिष्ठानचा दशावतारी गुरूपौर्णिमा उत्सव वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार दिलीप देसाई, प्रसिद्ध चित्रकार आनंद ठोंबरे, फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.
ज्या ठिकाणी कोणी पोहचत नाही, त्याठिकाणी तळागाळाला जाऊन मनुष्यरूपी हिरे, रत्न शोधून काढण्याचे कार्य फरा प्रतिष्ठान करीत आहे. या अलौकिक हियांना पैलू पाडून, योग्य कोंदणामध्ये बसवून जगासमोर आणण्याचे महान कार्य त्यांच्या हातून होत आहे. समाजातील विविध क्षेत्रातील रत्ने ओळखून त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवणे हे फरा प्रतिष्ठानचे कार्य एकप्रकारे ‘रत्नपारखी‘ प्रमाणे आहे, असे प्रतिपादन दिलीप देसाई यांनी केले.
यावेळी आदर्श शिक्षक फरा पुरस्कार अरूण पवार (कोलझर), अध्यापन भास्कर फरा पुरस्कार वैभव खानोलकर (उभादांडा स्कूल), आदर्श पत्रकारिता पुरस्कार दिनेश केळुसकर (संपादक-दै.हेरॉल्ड गोवा), स्नेहा विष्णू स्मृती नाट्य रंगकर्मी फरा पुरस्कार बाबली आकेरकर (आकेरी), सौ.हेमावती स्मृती महिला स्वावलंबन फरा पुरस्कार गायत्री निगुडकर (ओंकार प्रिटिग प्रेस, मळगाव), आरोग्यसेवा फरा पुरस्कार डॉ.जि.एन.लाड (कलंबिस्त), स्मार्टग्राम फरा पुरस्कार योगेश तेली (सरपंच-कोचरा), आदर्श कृषीरत्न फरा पुरस्कार संजय गावडे (आंबेगांव), आदर्श पत्रकारिता युवा प्रेरणा फरा पुरस्कार संदेश देसाई (दोडामार्ग), संगीता श्यामसुंदर स्मृती आदर्श संगीत/भजनी सेवा फरा पुरस्कार सुधीर सावंत बुवा (दोडामार्ग), शैला स्मृती आदर्श दिव्यांग प्रेरणा फरा पुरस्कार साक्षी परब (माडखोल), आदर्श ग्रमासेवा फरा पुरस्कार मुकुंद परब (ग्रामसेवक, असनिये), आदर्श अध्यात्म फरा पुरस्कार प्रशांत धोंड बुवा (पिगुळी), आदर्श ग्रामरत्न फरा पुरस्कार कृष्णा सावंत (माजी उपसभापती, सावंतवाडी) व आदर्श जीवनगौरव फरा भूष्ण पुरस्कार डॉ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर (निवृत्त वैद्यकीय अधिक्षक, सावंतवाडी) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावर्षी दत्तमाऊली दशावतारी नाट्यमंडळ व वेंगुर्ला दशावतार कमिटी यांच्यावतीने ज्येष्ठ प्रसिद्ध दशावतारी नाट्यकलावंत यशवंत तेंडोलकर, बाबी वेतोरकर, श्रीधर मुळीक, जयसिग आलव, सुरेश धुरी आदींची पाद्यपूजा करण्यात आली. पाहूण्यांची ओळख अॅड.पी.डी.देसाई व अॅड.सोनू गवस यांनी करून दिली. तर संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रवीण परब व तेजस देसाई यांनी केले.