संपूर्ण देशवासीयांचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले १२ किल्ले हे युनस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य‘ म्हणून त्यांचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ११ किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिजी या किल्ल्याचा समावेश आहे.
दरम्यान, मालवण व विजयदुर्ग येथे आनंदोत्सव करण्यात आला. मालवण बंदर जेटी येथे प्रशासन व किल्ले सिधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने तमाम शिवप्रेमींच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी करीत तसेच ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला.
सिधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन किल्ल्यांचा समावेश ‘युनेस्को‘च्या वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. यामुळे पर्यटकांना तसेच इतिहास अभ्यासकांना प्रेरणा मिळणार आहे. किल्ले स्वच्छता, पर्यटकांचे आदरातिथ्य आणि यातून रोजगार निर्मिती कशी होईल, यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, वेंगुर्ला भाजपातर्फे माणिकचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.