डेरवण येथील वालावलकर रूग्णालयातील डॉक्टरांनी स्पॉन्टेनियस सेरेब्रोस्पायनल फ्लूइड रायनोरिया या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराचे निदान करून नुकतेच यशस्वी उपचार केले आहेत.
चिपळूण येथील सुमारे 44 वषय एका महिलेला 15 दिवस सतत नाकातून पाणी गळत होते. सुरूवातीला त्यांनी सदचे लक्षण समजून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, वालावलकर रूग्णालयातील तपासणी दरम्यान, डॉ. राजीव केणी यांनी गंभीरतेची जाणीव करून दिली. हा आजार डोकेदुखी, चक्कर येणे अशा त्रासांना कारणीभूत ठरू शकतो आणि नाकातील संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण करतो. त्यामुळे तातडीने उपचार सुरू करणे अत्यावश्यक होते. निदानानंतर रूग्णाला तत्काळ मेंदू शस्त्रक्रिया विभागाकडे पाठवून मेंदू शल्यचिकित्सक डॉ.मृदुल भाटजीवाले यांनी सीटी सिस्टर्नोग्राम ही विशिष्ट प्रक्रिया केली. या प्रक्रियेत रुग्णाच्या पाठीमधून मेंदूच्या द्रवामध्ये रंगद्रव्य (डाय) सोडले जाते आणि त्यानंतर सीटी स्कॅन घेतला जातो. यामुळे द्रव कुठून नाकात गळत आहे हे अचूक ओळखता येते. शल्यचिकित्सक डॉ. राजीव केणी, डॉ. मृदुल भाटजीवाले तसेच भुलतज्ज्ञ डॉ. लिना ठाकूर आणि डॉ.अभिजीत यांच्या टीमने एंडोस्कोपीद्वारे सदरील रूग्णाच्या नाकातील गळती थांबविण्यात यश मिळविले. या शस्त्रक्रियेनंतर मेंदूतील पाणी गळण्याचे थांबले असून संभाव्य मेंदूच्या संसर्गाचा धोकाही टळला आहे. ही संपूर्ण शस्त्रक्रिया व रूग्णालयातील उपचार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आले.
आता डेरवणमध्ये जटिल व प्रगत मेंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात येत असून, रूग्णांना मोठ्या शहरांमध्ये प्रवास करण्याची गरज भासत नाही, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठमोठ्या रूग्णालयात होणाऱ्या अतिशय अवघड शस्त्रक्रिया आता वालावलकर रूग्णालयात होऊ लागल्या आहेत. ह्याचे सर्व श्रेय संस्थेने उपलब्ध करून दिलेली अतिशय उच्च दर्जाची अशी उपचार यंत्रणा व सर्व डॉक्टर्स, स्टाफ नर्सेस व इतर कर्मचारी यांना जात असल्यचे डॉ. मृदुल भाटजीवाले यांनी सांगितले.