आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या संकल्पनेतून ‘नाट्यदीप’ ही सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा18 जुलै रोजी कॅम्प येथील मधुसुदन कालेलकर नाट्यगृहात संपन्न झाली. यात सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्यातून 24 स्पर्धक सहभागी झाले होते. यात श्रद्धा गुरूदास जोशी (गोवा-पिर्ण) हिने प्रथम क्रमांकाचा नाट्यदीप चषक पटकावला. तिला रोख सात हजार रु. व मानपत्र देण्यात आले. तर केतकी सोमा सावंत (सावंतवाडी) हिने द्वितीय, हर्षा गणपुले (सत्तरी-गोवा) हिने तृतीय, सूरज शेटगांवकर (मोरजी-गोवा) व शिवम रायकर (फोंडा-गोवा) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. तसेच साहिल देसाई (कोलझर), पुरूषोत्तम पै (पर्वरी), हेमंत गोडकर (तळवडे), सर्वेश राऊळ (कोलगांव), यशश्री मराठे (तुळस) यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.
विजेत्यांना शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिराप, ज्येष्ठ रंगकम संजय पुनाळेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मिताली मातोंडकर, स्पर्धेचे परीक्षक जया गोरे व प्रशांत धोंड, स्पर्धेचे निवेदक खांडोळा-गोवा येथील डॉ. गोविंद भगत, स्पर्धेचे संगीत साथीदार मोरजी गोवा येथील शिवानंद दाभोलकर (ऑर्गन) व दत्तराज चारी (तबला), समर्पण फाऊंडेशनचे सहसचिव सुहास खोबरेकर, स्पर्धा संयोजक महेंद्र मातोंडकर, सचिन वालावलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष परब आदींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग व समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा सचिन वालावलकर मित्रमंडळ व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केली होती.
गोव्यातील नामवंत नाट्यगीत गाणारे गायक कलाकार या स्पर्धेत सहभागी झाल्याने आपल्या जिल्ह्यातील कलाकारांना कोणत्या प्रकारची तयारी लागते याची अनुभूती आली. ही स्पर्धा सवेश असल्याने ती पाहताना वेगळा आनंद घेता आला. डॉ. गोविंद भगत यांच्या निवेदनामुळे अभिजात संगीत नाटकाचा आजवरचा इतिहास आम्हाला जाणून घेता आला. या स्पर्धेने दर्जा कसा असतो याचे उदाहरण कायम केले, असे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले.
मानवी मनाला स्वगय आनंद देणारे संगीत या स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवायला मिळाले. तगड्या आणि नवख्या कलाकारांनीसुद्धा सुर, ताल, लयीचा समतोल राखत त्या पात्रातील भूमिकेत उतरून केलेले गायन दर्जेदार होते. तब्बल चार तास चाललेल्या या स्पर्धेने खिळवून ठेवण्याची किमया केली असल्याचे ज्येष्ठ रंगकम संजय पुनाळेकर म्हणाले.
बक्षिस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्पण फाऊंडेशनचे पदाधिकारी प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.