विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक व शारीरिक विकासासोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना संधी देण्याच्या उद्देशाने केंद्रशाळा उभादांडा नं.१ येथे मान्सून फेस्टीव्हल २०२५ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सलग तिसया वर्षी आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ २१ जुलै रोजी करण्यात आला. तर २ ऑगस्ट रोजी या फेस्टीव्हलची सांगता होणार आहे. या फेस्टीव्हलमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांसाठी विविध चर्चासत्रे, मार्गदर्शन सत्रे, कला-प्रदर्शने, स्पर्धा व सृजनात्मक उपक्रम घेण्यात येत आहेत. चार भिंतींच्या चाकोरीत राहून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होत नाही. या विचाराने प्रेरित होऊन शाळेत मुक्त, आनंददायी व दडपणमुक्त वातावरणात शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. मान्सून फेस्टीव्हलसारख्या उपक्रमांमुळे अभ्यासक्रमातील उद्दिष्ट्ये सहज साध्य होत असून, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास लक्षणीय वाढलेला दिसतो आहे. मुख्याध्यापक गणेश चव्हाण, सहकारी शिक्षक एकनाथ जानकर, अनिशा झोरे, युनुस पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी होत आहे. या अभिनव उपक्रमाचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन नरसुले, अनंत रेडकर, शांताराम भोने तसेच माजी विद्यार्थी, शतकोत्तर अमृत महोत्सव समितीचे पदाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.