वैभववाडी-नापणे धबधब्यावर उभारण्यात आलेल्या काचेच्या पुलाचा लोकार्पण सोहळा नुकताच पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते पार पडला. ‘सिधुरत्न‘ योजनेतून ९९ लाख ६३ हाजार रूपये खर्च करून हा पूल उभारण्यात आला आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच काचेचा पूल असल्याची माहिती राज्यभर पसरली आहे. त्यामुळे हा पूल व या पूलावरून धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरूनही पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
‘गोठणा‘ नदीवर असलेला नापणे हा बारमाही वाहणारा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या धबधब्याच्या दोन्ही बाजूने गर्द हिरवी झाडी, उंचावरून खोल डोहात कोसळणारे धबधब्याचे पांढरेशुभ्र फेसाळते पाणी असे विलोभनीय दृश्य पर्यटकांना भूरळ घालते. उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर पर्यटक मुख्य धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या छोट्या धबधब्यात उतरून आनंद घेतात.