वैभवशाली वेंगुर्ला- पहिले पुष्प – जयवंत दळवी

      जयवंत द्वारकानाथ दळवी हे मराठी साहित्य विश्वातील एक प्रसिद्ध नाव. लेखक, नाटककार तसेच पत्रकार अशी तीनही क्षेत्रात त्यांनी कामगिरी बजावली आहे. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1925 रोजी गोव्यातील हडफडे येथे झाला. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावचे. त्यांनी जवळच्या शिरोडा गावी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. जयवंत दळवींना ‌‘साहित्यिक‌’ ओळख मिळण्याआधीची पंधरासोळा वर्षे वेंगुर्ल्यातील आरवली गावात गेली. मी अजून ‌‘आरवलीकर‌’ राहिलो आहे. ‌‘मी आरवलीकर‌’ असल्यामुळेच माझी आवडनिवड वेगळी आहे. जयवंत दळवींचे आरवलीचे घर म्हणजे एक ऐसपैस वास्तू. मूळचे छोटे घर गरजेप्रमाणे त्या त्या वेळी वाढवलेले आहे. ते घर जसे अस्ताव्यस्त तसेच त्यांचे एकूण घराणेही अस्ताव्यस्त होते, असे दळवी म्हणत.

   एकूण गावाचागावातल्या प्रत्येक व्यक्तीचावृत्तीप्रवृत्तींचा, वासनेचा, उदात्ततेचा, संस्कृतीचा, विकृतीचा, स्वार्थाचा आणि निरिच्छनि:पक्षतेचा ठसा त्यांच्या साहित्यातून उमटलेला दिसतो. जयवंत दळवी यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी नाटके आणि पटकथा लिहिल्या. ‌‘ठणठणपाळ‌’ या टोपण नावाने स्तंभलेखन करून राजकारण्यांची खिल्ली उडवली. काही वर्षे ‌‘प्रभात‌’ ‌‘लोकमान्य‌’ वृत्तपत्रांमध्ये उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते युनायटेड स्टेट इन्फॉर्मेशन सर्विसेस (युएसआयएस) मध्ये रूजू झाले. इंग्रजी साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. लेखनासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी 1975 साली स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

    साहित्याच्या विविध प्रकारामध्ये त्यांनी लेखन केले यामध्ये कादंबरी, नाटक, विनोद, संपादकीय, प्रवासवर्णन, लघुकथा या सर्वांमध्ये त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या विविध कथांवर चित्रपट निर्मितीसुद्धा झाली आहेत. दळवींच्या ‌‘महानंदा‌’ सिनेमात त्यांच्या आरवलीच्या घराची दृश्ये आहेत. तरीसुद्धा तो चित्रपट मुंबईत लागला तेव्हा त्याकाळी घरातल्या कोणीही तो पाहिला नाही. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ कविता वगळता लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. दळवींचे लेखन उदंड होते तसेच दर्जेदार होते. 1948 साली ‌‘दातार मास्तर‌’ ही पहिली कथा ‌‘नवाकाळ‌’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्या लेखणीला बहर आला आणि  साहित्याचे विविध प्रकार त्यांनी समर्थपणे सांभाळले. 18 कादंबऱ्या, 19 नाटके, 10 विनोदी लेखन संग्रह, सहा चित्रपटकथा, प्रवास वर्णन, एकांकिका वगैरे एकूण सुमारे 70 हुन अधिक साहित्य कृती लिहिल्या. जयवंत दळवींच्या सर्वच लेखनात सहजपणा होता. वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यामध्ये होती. वाट्याला आलेल्या विलक्षण, व्यामिश्र अनुभवांनी अंतर्यामी उदास असणाऱ्या माणसांच्या व्यथावेदनांचे खिन्न करणारे चित्रण करणाऱ्या प्रतिभावंताने एक मुखवटा धारण केला होता, त्याचे नाव ‌‘ठणठणपाळ.‌’ ‌‘ठणठणपाळ‌’ हे टोपण नाव धारण करून ललित मासिकात त्यांनी ‌‘घटका गेली पळे गेली‌’ हे सदर वीस वर्षे चालविले. लौकिक जगात दिसणारे दळवींचे रूप प्रसन्न, विनोदी, मिश्किल बोलणारे, चेष्टा करणारे, दुसऱ्यांच्या विनोदाला खळखळून हसून दाददेणारे असे होते.

      ‌‘सारे प्रवासी घडीचे‌’ मध्ये अस्सल कोकणी माणसांची व्यक्तीचित्रे दळवींनी रंगवली. वरून भोळीभाबडी वाटणारी पण मोठी बिलंदर माणसे दळवींनी या पुस्तकात उभी केली आहेत. हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमासाठी निवडलेले आहे.

जयवंत दळवी माणसात रमणारे असले तरी वृत्तीने एकाकी होते. महाराष्ट्र शासनाचे, नाट्य परिषदेचे अनेक पुरस्कार त्यांना लाभले होते, पण गर्दीपासून ते दूर राहिले. सभा, संमेलने टाळली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी नाकारले होते. जयवंत दळवी चतुरस्र प्रतिभेचे लेखक होते. त्यांनी कधीच ‌‘मी लेखक आहे‌’ अशी ऐट घरात ठेवली नाही त्यांचा परमेश्वरावर विश्वास नव्हता. देवावरही नव्हता. पण वेतोबावर होता. याबद्दल कोणी हटकले तर ते म्हणत, ‌‘आयुष्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून तो माझा साथी आहे. वेतोबा! माझा संकल्पनेतला साथी.‌’ मराठी साहित्याला त्यांनी दिलेले योगदान फार महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे कोकणच्या लाल मातीतून आपल्या दर्जेदार साहित्यातून उत्तुंग शिखरावर पोचवणारे साहित्यिक म्हणून त्यांची ओळख सांगता येईल. अशा या प्रतिभावान लेखकाचे 16 सप्टेंबर 1994 रोजी निधन झाले.

   14 ऑगस्ट 2025 रोजी जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप होत असताना, त्यांचा साहित्यिक वारसा नेहमीच प्रेरणा देतो. त्यांच्या लेखनशैलीतील अनेक संदर्भ आजही तितकेच शाश्वत आहेत. त्यांच्या नाटकांकडे पाहताना किंवा कथाकादंबऱ्या वाचताना, पात्रे जणू आपल्या आजूबाजूलाच वावरताहेत असे भासते. काही तर इतकी घरगुती आणि जिव्हाळ्याची वाटतात की ती आपल्या घरातल्या दैनंदिन गप्पांचा, हास्याचा, भांडणाचाही भाग असल्यासारखी जाणवतात. कोकणच्या लाल मातीतून जन्मलेले दळवी  केवळ लेखक नाहीत, ते आपल्या अनुभवांचा, भावनांचा, आणि स्मृतींचा जिवंत दुवा आहेत. म्हणूनच, काळाच्या ओघात वैभवशाली वेंगुर्ल्यात स्मृतींची पानं जपताना जयवंत दळवी आणि त्यांच्यासोबत त्यांनी साहित्यातून रेखाटलेली माणसं वाचकांच्या मनात सदैव जिवंत आहेत.

संकल्पना आणि रेखाचित्रे   प्रा. सुनील नांदोसकर 9869540943

शब्दांकनप्रशांत आपटे 9422379595

 

   “वैभवशाली वेंगुर्लाहे सदर म्हणजे या सदरातून थोर व्यक्तींची ज्यांनी देशात आणि देशाबाहेरही वेंगुर्ल्याची किर्ती पसरवली आणि या गावाला एक नवी ओळख मिळवून दिली. त्याचबरोबर अशा संस्था ज्यांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केलं कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता निरपेक्ष सेवा दिली किंवा देत आहेत, अशा वेंगुर्ल्यातील संस्थांची ओळख करून घेणार आहोतसर्व वाचकांना आवाहन आहे की, तुमच्याकडे वेंगुर्ल्यातल्या अशा माणसांविषयी किंवा संस्थांविषयी माहिती असेल, तर आम्हाला जरूर पाठवा. योग्य माहिती असेल, तर ती या सदरात समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू.  – अधिक माहितीकरिता संपर्क  – 9422379595, 9869540943

Leave a Reply

Close Menu